बस प्रवासातील महिलांना गुंगीकारक औषध देऊन लुटणारा आरोपी जेरबंद; महाबळेश्वर पोलिसांची मोठी कारवाई

बस प्रवासातील महिलांना गुंगीकारक औषध देऊन लुटणारा आरोपी जेरबंद; महाबळेश्वर पोलिसांची मोठी कारवाई

महाबळेश्वर प्रतिनिधी :

महाबळेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बस प्रवास करणाऱ्या महिलांना विश्वासात घेऊन गुंगीकारक औषध देत दागिने आणि मोबाईल लंपास करणाऱ्या आरोपीला सातारा पोलिसांनी शिताफीने अटक करत मोठी कारवाई केली आहे. आरोपीकडून फसवणुकीतील मुद्देमालासह सुमारे साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २८ एप्रिल २०२६ रोजी दुपारी साडेतीन ते सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान एक महिला सातारा ते महाबळेश्वर एस.टी. बसमधून प्रवास करत होती. यावेळी आरोपी सतीश रामभाऊ बोन्हाडे उर्फ संदीप याने संबंधित महिलेशी ओळख वाढवत तिला लोन मिळवून देण्याचे आमिष दाखवले. विश्वास संपादन केल्यानंतर आरोपीने पिण्याच्या पाण्यामध्ये गुंगीकारक द्रव्य मिसळून महिलेला दिले. त्यानंतर तिच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे मंगळसूत्र आणि व्हिओ कंपनीचा मोबाईल असा एकूण सुमारे १ लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.

या प्रकरणी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३१८(२) व ३१८(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली महाबळेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बापुसाहेब सांडभोर यांनी विशेष तपास पथक तयार केले.

सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजने, महिला पोलीस उपनिरीक्षक काळे तसेच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने तातडीने तपास सुरू केला. महाबळेश्वर आणि सातारा एस.टी. स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात आला. तपासादरम्यान आरोपी पुण्यातील खराडी, चंदननगर परिसरातील गणपत हाउसिंग सोसायटी येथे राहत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी शिताफीने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून चोरीतील मुद्देमालासह जवळपास साडेतीन लाख रुपयांचा ऐवज जप्त केला. त्यानंतर आरोपीला महाबळेश्वर न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने पुढील तपासासाठी पोलीस कोठडी सुनावली. सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजने करत आहेत.

दरम्यान, अशा प्रकारच्या आणखी घटना इतर ठिकाणी घडल्या असल्यास नागरिकांनी तात्काळ महाबळेश्वर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

पोलीस निरीक्षक बापुसाहेब सांडभोर यांनी नागरिकांना, विशेषतः शाळकरी मुले-मुलींना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. प्रवासादरम्यान किंवा इतर कोणत्याही ठिकाणी अनोळखी व्यक्तीकडून खाण्यापिण्याच्या वस्तू स्वीकारू नयेत, तसेच कोणत्याही प्रकारचे सेंट किंवा सुगंधी वस्तूंचा वास घेऊ नये. संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात माहिती द्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl