“रात्रगस्तीत वनविभागाची मोठी कारवाई; खैर लाकडांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांसह आरोपी ताब्यात”
“रात्रगस्तीत वनविभागाची मोठी कारवाई; खैर लाकडांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांसह आरोपी ताब्यात”
प्रतापगड प्रतिनिधी :
महाबळेश्वर तालुक्यात वनविभागाने रात्रगस्तीदरम्यान मोठी कारवाई करत विनापरवाना खैर प्रजातीच्या लाकडांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. वन परिमंडळ अधिकारी श्री. सुनील लांडगे व त्यांच्या पथकाने ही धाडसी कारवाई करून दोन वाहने जप्त करत दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाबळेश्वर परिसरात रात्रगस्त करत असताना वनविभागाच्या पथकाला संशयास्पद हालचाल आढळून आली. तपासणी केली असता महिंद्रा पिकअप (MH 08 H 7790) आणि महिंद्रा स्कॉर्पिओ (MH 43 R 0906) या वाहनांमधून खैर प्रजातीचे लाकूड विनापरवाना वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले. तत्काळ कारवाई करत दोन्ही वाहने ताब्यात घेण्यात आली.
या प्रकरणात श्री. संतोष पांडुरंग पार्टे आणि समीर संतोष पार्टे (रा. केळघर, ता. जावळी, जि. सातारा) या दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांनी प्राथमिक चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली आहे. वन परिमंडळ अधिकारी महाबळेश्वर यांनी भारतीय वन अधिनियम १९२७ च्या कलम ४१(२)(ब) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या वाहनांसह खैर लाकडांचा एकूण अंदाजे ५ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल वनविभागाने ताब्यात घेतला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वन परिमंडळ अधिकारी श्री. सुनील लांडगे हे करत आहेत.
ही कारवाई मा. उपवनसंरक्षक सातारा श्री. अमोल सातपुते, मा. सहा वनसंरक्षक सातारा श्री. प्रदीप रौंदळ तसेच मा. वन परिक्षेत्र अधिकारी महाबळेश्वर श्री. महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वनसंपत्तीचे रक्षण करण्यासाठी वनविभागाने उचललेल्या या ठोस पावलाचे सर्वत्र स्वागत होत असून, बेकायदेशीर वृक्षतोड व वाहतुकीविरोधात कठोर कारवाईचा इशाराही यानिमित्ताने देण्यात आला आहे.
Comments
Post a Comment