“शिस्तीच्या बळावर शिवसेना अधिक भक्कम; महाबळेश्वरात संघटन विस्ताराचा निर्धार”
महाबळेश्वर प्रतिनिधी —
नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशानंतर महाबळेश्वर तालुक्यात शिवसेनेने संघटन अधिक मजबूत करण्यासाठी कंबर कसली आहे. शिस्त, संघटन आणि विस्तार या त्रिसूत्रीच्या आधारे पक्ष बळकट करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. पंचायत समिती महाबळेश्वर येथे आयोजित शिवसेना कार्यकर्त्यांच्या बैठकीत तालुका प्रमुख गणेश उतेकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना हा संदेश दिला.
या बैठकीत बोलताना उतेकर यांनी निवडणुकीत परिश्रम घेणाऱ्या कार्यकर्त्यांचे मनापासून कौतुक केले. “निवडणुकीतील यश हे कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फलित आहे. मात्र हे यश टिकवण्यासाठी आणि पुढे अधिक मोठ्या विजयासाठी संघटनेत शिस्त राखणे अत्यावश्यक आहे,” असे ते म्हणाले. प्रत्येक कार्यकर्त्याने पक्षाच्या विचारसरणीशी निष्ठा ठेवून काम केल्यास संघटना अधिक मजबूत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महाबळेश्वर तालुक्यातील प्रत्येक गावात शिवसैनिक कार्यरत असून, या संघटन जाळ्याचा विस्तार करण्यावर आगामी काळात विशेष भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. सक्रिय व निष्ठावान कार्यकर्त्यांची निवड करून त्यांना अधिक जबाबदाऱ्या दिल्या जातील, तसेच पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
शिवसेना हा सर्वसामान्य जनतेचा पक्ष असल्यामुळे तळागाळातील प्रश्न सोडवण्यासाठी कार्यकर्त्यांनी अधिक सक्रिय व्हावे, असे आवाहन करताना त्यांनी पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अभिमान वाटेल असे काम महाबळेश्वर तालुक्यात उभे करण्याचा संकल्प व्यक्त केला.
या बैठकीस जिल्हा प्रमुख रणजीत भोसले, रेश्मा जगताप, पंचायत समिती महाबळेश्वरचे उपसभापती संजय मोरे, जिल्हा परिषद सदस्य अजित संकपाळ, तसेच तालुका स्तरावरील पदाधिकारी, पंचायत समिती सदस्य, शाखाप्रमुख आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. बैठकीत झालेल्या मार्गदर्शनामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, आगामी काळात संघटन अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
Comments
Post a Comment