“सदरबझारात हिंदू एकतेचा जयघोष; साताऱ्यात १७ संमेलनांच्या मालिकेला दमदार सुरुवात”

“सदरबझारात हिंदू एकतेचा जयघोष; साताऱ्यात १७ संमेलनांच्या मालिकेला दमदार सुरुवात”

सातारा प्रतिनिधी : 

सातारा शहरातील सदरबझार येथे जिल्ह्यातील पहिले हिंदू संमेलन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडले असून, या संमेलनातून हिंदू एकतेचा प्रभावी संदेश देण्यात आला. दि. १ आणि २ एप्रिल रोजी श्री हनुमान मंदिर परिसरात संपन्न झालेल्या या भव्य कार्यक्रमाने शहरासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले. विशेष म्हणजे, सातारा शहरात एकूण १७ ठिकाणी हिंदू संमेलनांची मालिका आयोजित करण्यात आली असून, त्याची ही सुरुवात मानाची मानली जात आहे.

गेल्या अनेक दशकांपासून हिंदू समाजाच्या संघटनासाठी कार्यरत असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेच्या १०० वर्षांच्या पूर्तीनिमित्त देशभरात विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून हिंदू समाजात ऐक्य निर्माण करणे, सांस्कृतिक वारशाचे जतन करणे आणि समाजातील विविध घटकांना एकत्र आणणे या उद्दिष्टांसाठी या संमेलनांचे आयोजन करण्यात येत आहे.

सदरबझार हा परिसर नेहमीच सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यात अग्रेसर राहिला असून, या पहिल्या संमेलनातून दिलेला एकतेचा संदेश संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास हिंदू संमेलन समितीचे अध्यक्ष तथा नगरसेवक शंकर माळवदे यांनी व्यक्त केला. या संमेलनामागील मुख्य हेतू जाती-पातींच्या पलीकडे जाऊन ‘हिंदू’ म्हणून एकत्र येणे, नव्या पिढीला परंपरा आणि संस्कृतीची जाणीव करून देणे तसेच समाजासमोरील विविध प्रश्नांवर विचारमंथन करणे हा होता.

दि. १ एप्रिल रोजी सदरबझार पेठेतून काढण्यात आलेली भव्य शोभायात्रा हे या संमेलनाचे प्रमुख आकर्षण ठरले. फटाक्यांच्या आतषबाजीत निघालेल्या या शोभायात्रेत श्री महिषासुर मर्दिनी आणि श्री हनुमान यांच्या वेशभूषेतील कलाकारांनी उपस्थितांचे मन जिंकले. वासोळे येथील भजनी मंडळ व कीर्तन मंडळाने सादर केलेल्या कार्यक्रमांनी वातावरण भक्तिमय केले, तर ऐतिहासिक शस्त्रविद्या प्रदर्शनाने उपस्थितांमध्ये उत्सुकता निर्माण केली. लहान मुलांनी विविध वेशभूषेत साकारलेले ऐतिहासिक महापुरुष आणि रणरागिणींचे रूप विशेष लक्षवेधी ठरले.

दि. २ एप्रिल रोजी झालेल्या कार्यक्रमात शाहीर शुभम भुतकर यांनी सादर केलेला पोवाडा अंगावर रोमांच उभे करणारा ठरला. सौ. भक्ती डाफळे यांनी केलेले मार्गदर्शन महिलांसाठी तसेच युवकांसाठीही प्रेरणादायी ठरले. परमपूज्य महंत परशुरामजी महाराज वाघ (मठाधिपती, कार्तिक स्वामी मंदिर, देवदरी, ता. खटाव) यांच्या आशीर्वचनांनी समाज एकत्रीकरणाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चे प्रांत कार्यकारिणी सदस्य युवराज कुलकर्णी यांनी संघाची स्थापना, उद्दिष्टे आणि कार्य याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

नारायणी समूहाच्या माता भगिनींनी सादर केलेल्या ‘राम तांडव’ नृत्याने कार्यक्रमाला वेगळेच आकर्षण प्राप्त करून दिले. संमेलनात मोठ्या प्रमाणावर मातृशक्तीची उपस्थितीही विशेष उल्लेखनीय ठरली. समाजात महिलांचा ५० टक्के सहभाग असल्याचे अधोरेखित करत त्यांच्या सक्रिय सहभागाचे महत्त्व यावेळी व्यक्त करण्यात आले.

या कार्यक्रमापुरते मर्यादित न राहता हिंदू समाजाच्या एकत्रीकरणासाठी, संरक्षणासाठी आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी सातत्याने कार्यरत राहण्याचे आवाहन समितीचे उपाध्यक्ष डॉ. शंकर गोसावी यांनी केले. कार्यक्रमास समरसता मंचाचे प्रांत संयोजक मुकुंद आफळे, जिल्हा कार्यवाह महेश शिवदे, सहकार्यवाह संदीप आठल्ये, शहर कार्यवाह रवी गायकवाड यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.

सदरबझार हिंदू संमेलन समितीचे सर्व सदस्य, नगरसेवक-नगरसेविका, सामाजिक कार्यकर्ते, युवक, माता भगिनी आणि नागरिक यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा भव्य कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. या संमेलनामुळे सातारा शहरात हिंदू एकतेची नवी ऊर्जा निर्माण झाली असून, आगामी संमेलनांसाठीही उत्सुकता वाढली आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl