“कडेपठारावर विद्यार्थ्यांचे श्रमदान; देवराई पुनरुज्जीवनासोबत गड स्वच्छतेचा आदर्श उपक्रम”
“कडेपठारावर विद्यार्थ्यांचे श्रमदान; देवराई पुनरुज्जीवनासोबत गड स्वच्छतेचा आदर्श उपक्रम”
जेजुरी प्रतिनिधी –
जेजुरी येथील तीर्थक्षेत्र श्री कडेपठार गडावर “देवराई पुनरुज्जीवन” आणि “महास्वच्छता अभियान २०२६” अंतर्गत विद्यार्थ्यांनी केलेल्या श्रमदानामुळे गड परिसर स्वच्छतेचा आणि पर्यावरण संवर्धनाचा आदर्श ठरला आहे. Savitribai Phule Pune University, राष्ट्रीय सेवा योजना, सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे, सृष्टीसृजन फाउंडेशन, श्री खंडोबा देवता व लिंग कडेपठार ट्रस्ट, जेजुरी आणि Maharashtra Forest Department यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या मोहिमेत सृष्टी सृजन फाउंडेशनचे संस्थापक जनार्दन दुकळे यांच्या पुढाकाराने सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे सुमारे ६० विद्यार्थी, वन विभागाचे १५ ते २० कर्मचारी, व्यसनमुक्ती युवक संघाचे स्वयंसेवक तसेच देवस्थानचे कर्मचारी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम देवस्थानाच्या “अशोकवन देवराई” परिसरात श्रमदान करत सुमारे सहाशे झाडांची मशागत केली. यामध्ये तण काढणे, खत व पाणी देणे, झाडांना आळे करणे, कचरा उचलणे, तसेच दगडधोंड्यांची नीट मांडणी व कुंपण दुरुस्ती अशी विविध कामे करण्यात आली.
यानंतर पंचलिंग मंदिर परिसरात शोषखड्डे घेण्याचे काम करण्यात आले. दरम्यान वन विभागाच्या स्वयंसेवकांनी गड चढाईच्या पायरी मार्गावरील दुतर्फा पडलेला कचरा गोळा करून संपूर्ण मार्ग स्वच्छ केला. मध्यान्हानंतर मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा, बाटल्या, वेफर्स रॅपर्स, थर्माकॉल कप, टेट्रापॅक्स, पूजा साहित्याचे अवशेष, नारळाच्या शेंड्या आदी विविध प्रकारचा कचरा गोळा करण्यात आला. विशेष म्हणजे, हा कचरा गडावर न ठेवता पायथ्याशी आणून जेजुरी नगरपालिकेकडे सुपूर्द करण्यात आला.
या उपक्रमात धनंजय देवकर (वन संरक्षक, जेजुरी) यांच्यासह वन विभागाचे अधिकारी, व्यसनमुक्ती युवक संघाचे स्वयंसेवक, कडेपठार देवस्थानचे कर्मचारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या सर्वांच्या संयुक्त प्रयत्नातून गड परिसर स्वच्छ आणि सुस्थितीत ठेवण्याचा संदेश देण्यात आला.
वन विभागाच्या वतीने गडावर येणाऱ्या भाविक, नागरिक, व्यावसायिक आणि पुजारी वर्गाला आवाहन करण्यात आले की, गडाची स्वच्छता राखणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून कचरा न करणे आणि होऊ न देणे यासाठी सर्वांनी सजग राहणे आवश्यक आहे.
श्री खंडोबा देवता व लिंग कडेपठार ट्रस्ट, जेजुरी यांच्या वतीने सहभागी सर्व संस्था व स्वयंसेवकांचे आभार मानून त्यांचा सन्मान करण्यात आला. या उपक्रमामुळे पर्यावरण संरक्षणासोबतच सेवाभाव आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव अधिक दृढ झाल्याचे दिसून आले.
Comments
Post a Comment