नो एन्ट्रीचा बोजवारा! महाबळेश्वर मुख्य बाजारपेठेत वाहनांचा सुळसुळाट; पर्यटक आणि नागरिक हैराण

नो एन्ट्रीचा बोजवारा! महाबळेश्वर मुख्य बाजारपेठेत वाहनांचा सुळसुळाट; पर्यटक आणि नागरिक हैराण

✍️मिलिंद काळे,

महाबळेश्वर प्रतिनिधी : 

पर्यटन हंगामाची सुरुवात होताच शहरातील मुख्य बाजारपेठेत पुन्हा एकदा वाहतुकीचा गोंधळ निर्माण झाल्याचे चित्र समोर येत आहे. पादचारी आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी ‘नो एन्ट्री’ घोषित करण्यात आलेल्या या भागात चारचाकी आणि दुचाकी वाहनांची सर्रास वर्दळ सुरू असून नियमांचा उघडपणे भंग होत असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

शहरातील विविध चौकांमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात असतानाही मुख्य बाजारपेठेत वाहनांची मुक्तपणे ये-जा सुरू असल्याचे वास्तव आहे. विशेष म्हणजे काही स्थानिक नागरिकांसह नामांकित पंचतारांकित हॉटेलमधील कर्मचारीदेखील दुचाकी घेऊन बाजारपेठेतून जाताना दिसत आहेत. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी पादचाऱ्यांना मार्ग काढताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून अपघाताची शक्यता वाढली आहे.


पर्यटकांची मोठी गर्दी असलेल्या या भागात काही वाहनचालकांकडून बेदरकारपणे वाहन चालवले जात असल्याचेही दिसून येते. मोठ्या आवाजात हॉर्न वाजवणे, वेगाने वाहन चालवणे अशा प्रकारांमुळे बाजारपेठेतील शांततेचा भंग होत असून पर्यटकांच्या अनुभवावरही विपरीत परिणाम होत आहे. पर्यटननगरी म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरची प्रतिमा यामुळे मलिन होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

सर्वात चिंताजनक बाब म्हणजे इतक्या स्पष्टपणे नियमभंग होत असतानाही पोलीस प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ‘नो एन्ट्री’ हा नियम केवळ कागदावरच राहिला आहे का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे मनोबल वाढत असल्याची टीकाही होत आहे.

स्थानिक नागरिकांमध्ये याबाबत तीव्र नाराजी असून “मुख्य बाजारपेठ ही पादचारी आणि पर्यटकांसाठी सुरक्षित ठेवण्याचा उद्देश असताना वाहनांना मोकळीक का दिली जाते? पोलीस बंदोबस्त असूनही कारवाई का होत नाही?” असा संतप्त प्रश्न विचारला जात आहे. काही नागरिकांनी तात्काळ कडक दंडात्मक कारवाई, सीसीटीव्ही निरीक्षण वाढवणे आणि पूर्णवेळ वाहतूक नियंत्रण पथक तैनात करण्याची मागणी केली आहे.

पर्यटननगरीची ओळख आणि शिस्त अबाधित राखण्यासाठी तसेच पर्यटकांना सुरक्षित व सुखद अनुभव देण्यासाठी प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलणे आवश्यक असल्याचे स्पष्ट होत आहे. अन्यथा, ‘नो एन्ट्री’चा फज्जा उडत राहून भविष्यात गंभीर अपघात घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl