ठेवी, व्यवसाय आणि नफ्यात झेप; रयत सेवक बँकेची दमदार कामगिरी
ठेवी, व्यवसाय आणि नफ्यात झेप; रयत सेवक बँकेची दमदार कामगिरी
गोडोली – प्रतिनिधी
दि रयत सेवक को-ऑपरेटिव्ह बँक लि. या सहकारी बँकेने ३१ मार्च २०२६ अखेरच्या आर्थिक वर्षात ठेवी, व्यवसाय आणि नफ्यात लक्षणीय वाढ नोंदवत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या या बँकेचा ऑडिट वर्ग सातत्याने ‘अ’ राहिला असून आर्थिक शिस्त आणि पारदर्शकतेचा ठसा कायम ठेवण्यात बँकेला यश आले आहे.
बँकेच्या एकूण ठेवी तब्बल १६९१.८८ कोटी रुपयांवर पोहोचल्या असून एकूण व्यवसायाने २७६६.०९ कोटींचा टप्पा गाठला आहे. भागभांडवल ११६.९१ कोटी रुपये इतके असून कर्ज वितरण १०७४.२१ कोटी रुपयांपर्यंत झाले आहे. सीडी रेशो ६३.४९ टक्के राहिला असून बँकेने १४.९६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. या कामगिरीमुळे ठेवी आणि व्यवसायात रयत बँक अग्रस्थानी राहिल्याची माहिती चेअरमन नंदकुमार गायकवाड यांनी दिली.
२०२५-२६ या आर्थिक वर्षात बँकेच्या ठेवींमध्ये ९६.२४ कोटी रुपयांची वाढ झाली, तर एकूण व्यवसायात १२५.७० कोटी रुपयांची वाढ नोंदवली गेली. भांडवली बळकटीसाठी भागभांडवल आणि निधीही वाढला असून आर्थिक स्थैर्य अधिक मजबूत झाले आहे. एनपीए केवळ ०.७६ टक्क्यांवर नियंत्रणात ठेवण्यात बँकेला यश आले असून कर्जदार सभासदांना व्याजावर २ टक्के रिबेट देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे.
गुंतवणूक क्षेत्रातही बँकेने प्रगती साधत ७९७.४६ कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक वाढवली आहे. आधुनिक बँकिंगच्या दिशेने वाटचाल करत मोबाईल बँकिंग, UPI, IMPS, POS, पेमेंट गेटवे आणि QR कोडसारख्या डिजिटल सुविधा प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच Yotta कंपनीच्या क्लाऊड डेटा सेंटरच्या माध्यमातून सायबर सुरक्षा अधिक मजबूत करण्यात आली आहे. २०२५-२६ या वर्षात विविध क्षेत्रांत तीन पुरस्कार पटकावत बँकेने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.
या यशामध्ये व्हा. चेअरमन दिलीप डहाळे, संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी भास्कर कणसे तसेच सर्व कर्मचारी यांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे. शरद पवार यांनी बँकेच्या कामगिरीचे कौतुक केले असून संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी आणि सचिव विकास देशमुख यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी बँकेच्या संचालक व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
Comments
Post a Comment