आरफळ जिल्हा परिषद शाळेचा दणदणीत यशस्वी झेंडा; विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांची जिल्हा व राज्यस्तरावर चमकदार कामगिरी

आरफळ जिल्हा परिषद शाळेचा दणदणीत यशस्वी झेंडा; विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांची जिल्हा व राज्यस्तरावर चमकदार कामगिरी

सातारा प्रतिनिधी:

सातारा तालुक्यातील आरफळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने शैक्षणिक क्षेत्रात पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध करत विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. ‘विनर ऑफ द इयर’ परीक्षेत शाळेच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा व तालुकास्तरावर अव्वल स्थान पटकावत शाळेचा लौकिक वाढवला आहे.

या परीक्षेत साई पवार आणि वरद दिक्षीत यांनी जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवून उत्कृष्ट कामगिरी नोंदवली, तर ईश्वरी पवार हिने जिल्हास्तर द्वितीय स्थान मिळवले. तालुकास्तरावर सानवी पवार हिने प्रथम, श्रीशा पवार हिने द्वितीय आणि अवनी माने हिने तृतीय क्रमांक पटकावला.

तसेच ‘मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा’ परीक्षेतही विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे. साई पवार याने केंद्रात पाचवा व तालुक्यात आठवा क्रमांक मिळवला. ध्रुव क्षिरसागर, अंशिका पवार आणि सर्वेश पवार यांनी केंद्रात प्रथम क्रमांक मिळवत शाळेचे नाव उंचावले. वरद दिक्षीत याने केंद्रात द्वितीय, तर ईश्वरी पवार हिने पाचवा क्रमांक पटकावून आपली गुणवत्ता सिद्ध केली.

शाळेच्या एकूण प्रगतीकडे पाहता, ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमात केंद्रस्तरावर प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान शाळेला मिळाला आहे. तसेच ‘निपुण सुपर स्मार्ट स्कूल 2026’ हा बहुमान मिळवून शाळेने आधुनिक शिक्षण पद्धतीचा स्वीकार केल्याचे दाखवून दिले आहे. शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा (SQAAF) अंतर्गत ‘अ’ श्रेणी मिळाल्यामुळे शैक्षणिक दर्जा अधिक ठळकपणे समोर आला आहे.

याशिवाय CBSE पॅटर्नवर आधारित अभ्यासक्रम राबविणे आणि Word Power Championship (LFW) स्पर्धेत जिल्हास्तरावर चार विद्यार्थ्यांची निवड होणे, ही शाळेच्या प्रगतीची आणखी एक महत्त्वाची पायरी ठरली आहे.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे सर्वत्र कौतुक होत असून, समस्त ग्रामस्थ आरफळ यांच्या वतीने विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे. शाळेच्या या उज्ज्वल कामगिरीमुळे ग्रामीण भागातील शिक्षणाची गुणवत्ता आणि क्षमता अधोरेखित झाली असून, इतर शाळांसाठीही हा एक प्रेरणादायी आदर्श ठरत आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl