महिला आरक्षणावरून काँग्रेसचा केंद्रावर हल्लाबोल; ‘८५०’ आकड्यावर स्पष्टीकरणाची मागणी
महिला आरक्षणावरून काँग्रेसचा केंद्रावर हल्लाबोल; ‘८५०’ आकड्यावर स्पष्टीकरणाची मागणी
सातारा प्रतिनिधी :
महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीने केंद्र सरकारवर तीव्र टीका करत अंमलबजावणीतील विलंब आणि आकडेवारीतील संदिग्धतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. महिला आरक्षण विधेयक २०२३ मध्ये संसदेत मंजूर झाले असले, तरी त्याची अंमलबजावणी पुढे ढकलली जात असल्याचा आरोप करत काँग्रेसने भाजपच्या भूमिकेवर निशाणा साधला.
काँग्रेस भवन, सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे खजिनदार अभय छाजेड यांनी भाजप सरकारवर महिला आरक्षणाच्या नावाखाली राजकीय गणिते साधण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. “लोकसभेच्या विद्यमान ५४३ जागांमध्येच महिला आरक्षण लागू करावे, ही काँग्रेसची ठाम भूमिका आहे. मात्र ‘८५०’ हा आकडा नेमका कशाच्या आधारे पुढे आणला जात आहे, याचे स्पष्ट उत्तर सरकारने द्यावे,” अशी मागणी त्यांनी केली.
या पत्रकार परिषदेस प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजेंद्र शेलार , प्रदेश काँग्रेसचे सचिव यासिन शेख, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुषमा घोरपडे, सातारा शहर ब्लॉक काँग्रेसच्या अध्यक्षा रजनी पवार यांच्यासह मनोज तपासे, सुरेश इंगवले आदी उपस्थित होते.
अभय छाजेड पुढे म्हणाले की, महिला आरक्षणासाठी काँग्रेसने सातत्याने पाठपुरावा केला असून राहुल गांधी यांनीही यासाठी संघर्ष केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते संसदेपर्यंत महिलांचे प्रतिनिधित्व वाढवण्यात काँग्रेसची भूमिका महत्त्वाची राहिली असल्याचा दावा त्यांनी केला. २०२३ मध्ये विधेयक मंजूर झाले असले, तरी त्याची अंमलबजावणी २०२९ नंतर करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आल्याने त्यावर शंका निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
“जनगणना प्रक्रियेचा आधार देत अंमलबजावणी लांबणीवर टाकली जात आहे. ती वेळेत पूर्ण होईल का, याबाबत अनिश्चितता आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करताना त्यांनी महागाई, आर्थिक अडचणी आणि शेती तसेच कामगार क्षेत्रातील निर्णयांचा फटका सामान्य नागरिकांना बसत असल्याचा आरोप केला.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधताना काँग्रेसने महिला आरक्षण हा केवळ राजकीय विषय नसून सामाजिक न्यायाचा मुद्दा असल्याचे अधोरेखित केले. महिलांच्या हक्कांसाठी काँग्रेस कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
खुल्या चर्चेचे आव्हान
यावेळी राजेंद्र शेलार यांनी भाजपवर टीका करत खुले आव्हान दिले. “सत्ता आणि अफाट संपत्तीच्या जोरावर भाजप महिलांच्या पाठींब्याचे मेळावे घेत आहे. मात्र खरोखरच हिंमत असेल, तर महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी समोरासमोर खुली चर्चा करावी. आम्ही त्यांचे षडयंत्र उघड करू. राजवाड्यासमोरील गांधी मैदानावर खुल्या चर्चेचे आव्हान त्यांनी स्वीकारावे,” असे शेलार म्हणाले.
Comments
Post a Comment