महाबळेश्वर पालिकेच्या सभेत स्वच्छतेवरून ठेकेदाराला इशारा; “दोन दिवसांत सुधारणा नाही तर ठेका रद्द”

महाबळेश्वर पालिकेच्या सभेत स्वच्छतेवरून ठेकेदाराला इशारा; “दोन दिवसांत सुधारणा नाही तर ठेका रद्द”

महाबळेश्वर : प्रतिनिधी

महाबळेश्वर नगर परिषदेच्या दुसऱ्या सर्वसाधारण सभेत शहरातील स्वच्छता व्यवस्था, अतिक्रमण, शिक्षण संस्थांतील गोंधळ आणि विविध नागरी प्रश्नांवर जोरदार चर्चा रंगली. लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील शिंदे, उपाध्यक्ष नसीरभाई मुलानी आणि मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या सभेत एकूण २७ महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली असून त्यातील बहुतांश विषयांना मुखसंमती देण्यात आली.

विरोधी पक्षनेते कुमार शिंदे यांच्या अनुपस्थितीत पार पडलेल्या या सभेत विविध विभागांच्या कार्यप्रणालीवर सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. महाबळेश्वर गिरिस्थान नगर परिषद संचालित उच्च माध्यमिक शिक्षण संस्थेतील शिक्षकांची अंतर्गत गटबाजी, वारंवार होणारी गैरहजेरी आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाचा मुद्दा शिक्षण सभापती रोहित ढेबे यांनी उपस्थित केला. शिक्षण संस्थांमध्ये शिस्त आणि गुणवत्तेचा अभाव निर्माण होत असल्याचे सांगत त्यांनी प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली.

शहरातील मुख्य चौकांमध्ये वाढत्या अतिक्रमणाचा मुद्दा उपस्थित करत भाजपा नगरसेवक रवींद्र कुंभारदरे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी, पादचाऱ्यांना होणारा त्रास आणि शहराच्या सौंदर्यावर परिणाम होत असल्याचे सांगत तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

सभेतील सर्वाधिक चर्चेचा विषय मात्र शहरातील ढासळलेली स्वच्छता व्यवस्था ठरली. स्वच्छता सभापती संजय जंगम यांनी स्वच्छता ठेकेदाराच्या कार्यपद्धतीवर कठोर शब्दांत टीका करत अनेक गंभीर बाबी सभागृहासमोर मांडल्या. ठेकेदाराकडे पुरेसे मनुष्यबळ नसणे, घंटागाड्यांची कमतरता, कचऱ्याचे योग्य वर्गीकरण आणि निर्जंतुकीकरण न करता थेट डम्पिंग ग्राउंडवर कचऱ्याचे ढिगारे उभे केले जात असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.

वर्षाकाठी जवळपास चार कोटी रुपयांच्या या स्वच्छता ठेक्याबाबत नागरिकांकडून वारंवार तक्रारी येत असल्याचे नमूद करत, येत्या दोन दिवसांत ठेकेदाराच्या उपस्थितीत स्वच्छता विभागाची विशेष बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती संजय जंगम यांनी दिली. या बैठकीत ठोस उपाययोजना निश्चित करण्यात येतील, अन्यथा संबंधित ठेका रद्द करण्याचा कठोर निर्णय घेतला जाईल, असा इशाराही त्यांनी आपल्या आक्रमक भाषणातून दिला.

दरम्यान, नगर परिषदेकडे नव्याने दाखल करण्यात आलेल्या शववाहिनीबाबत विरोधकांनी “जुनी वाहन सेवेत आणली” असा आरोप केला होता. या आरोपांचे खंडन करत नगराध्यक्ष सुनील शिंदे यांनी उपस्थित पत्रकारांना सदर शववाहिनी अत्याधुनिक व नवीन असल्याचे स्पष्ट केले. तसेच ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील यांनी केलेल्या सहकार्याबद्दल पालिकेच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.

सभेचे सूत्रसंचालन कर निरीक्षक अमित माने यांनी केले. सभेत शहर विकास, नागरी सुविधा आणि प्रशासनातील सुधारणा यांसंदर्भात विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली असून आगामी काळात महाबळेश्वर शहरातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी ठोस निर्णय घेण्याचे संकेत या सभेतून मिळाले.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl