“निर्दयी बापाचं थरकाप उडवणार कृत्य ! ६ वर्षीय मुलाला कृष्णा नदीत फेकून खून”
“निर्दयी बापाचं थरकाप उडवणार कृत्य ! ६ वर्षीय मुलाला कृष्णा नदीत फेकून खून”
उंब्रज प्रतिनिधी—
कराड तालुक्यातील वडोली भिकेश्वर परिसरात सापडलेल्या एका चिमुकल्याच्या मृतदेहाचा धक्कादायक उलगडा झाला असून, जन्मदात्या बापानेच आपल्या ६ वर्षीय मुलाचा खून केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या अमानुष कृत्यामुळे संपूर्ण परिसर हादरला असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
सिद्धार्थ मल्लिकार्जुन आरेकेरी (वय ६) असे मृत मुलाचे नाव असून, आरोपी वडील मल्लिकार्जुन आरेकेरी (रा. नागठाण, ता. विजापूर, कर्नाटक) यानेच मुलाला कृष्णा नदी मध्ये फेकून ठार मारल्याची कबुली पोलिस तपासात दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ मार्च रोजी आरोपीने पत्नीला मुलाला होस्टेलला सोडण्यासाठी जात असल्याचे सांगून सिद्धार्थला घरातून नेले. मात्र, उंब्रजजवळील निर्जन भागात नेऊन त्याने मुलाला निर्दयपणे नदीपात्रात फेकून खून केला. आरोपी यापूर्वी वडोली भिकेश्वर परिसरात वाळू उपसा कामासाठी येत असल्याने त्याला हा भाग चांगलाच परिचित होता.
या क्रूर कृत्यापूर्वी मुलाला नवीन कपडे घालण्यात आल्याचेही तपासात समोर आले आहे. खून केल्यानंतर आरोपी कोणतीही शंका येऊ नये म्हणून शांतपणे घरी परतला. दरम्यान, १ एप्रिल रोजी मुलाचा वाढदिवस असल्याने आई भाग्यश्री हिने मुलाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क न झाल्याने तिचा संशय बळावला. वारंवार विचारणा करूनही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने तिने पोलिसांत मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.
दरम्यान, १८ मार्च रोजी मसूर पोलिसांना वडोली भिकेश्वर हद्दीत कृष्णा नदी मध्ये एका चिमुकल्याचा मृतदेह आढळून आला होता. ओळख पटवण्यासाठी विविध पोलीस ठाण्यांना फोटो पाठवण्यात आले होते. याच धाग्यावरून कर्नाटक पोलिसांनी तपास वेगाने पुढे नेत अखेर या हत्येचा उलगडा केला.
शनिवारी सायंकाळी कर्नाटक पोलिसांनी आरोपीला घटनास्थळी आणून पंचनामा केला. यावेळी मसूर पोलिसांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खरात, सहाय्यक फौजदार सुधाकर भोसले, प्रदीप पाटील, अमोल पवार आणि एस. सी. लावंड यांनी तपासात महत्त्वाचे सहकार्य केले.
दरम्यान, स्वतःच्या पोटच्या मुलाचा जीव घेण्यामागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, पुढील तपासात याचा उलगडा होण्याची शक्यता आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे समाजमन सुन्न झाले असून, आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
Comments
Post a Comment