महाबळेश्वरात महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर; ८३ महिलांची तपासणी, कॅन्सर जनजागृतीला चालना
महाबळेश्वरात महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर; ८३ महिलांची तपासणी, कॅन्सर जनजागृतीला चालना
महाबळेश्वर प्रतिनिधी :
महाबळेश्वर तसेच दुर्गम आणि डोंगराळ ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण उपक्रम राबवित इनर व्हील क्लब ऑफ महाबळेश्वर, रोटरी क्लब ऑफ महाबळेश्वर आणि कृष्णा विश्वविद्यापीठ कराड यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकूण ८३ महिलांची तपासणी करण्यात आली असून, महिलांमध्ये वाढत्या कॅन्सरविषयक समस्यांबाबत जनजागृती करण्यावर विशेष भर देण्यात आला.
या उपक्रमासाठी रोटरी आशा मोबाईल स्क्रीनिंग व्हॅन उपलब्ध करून देण्यात आली होती. ११ वैद्यकीय तज्ञांच्या टीमने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने विविध तपासण्या पार पाडल्या. महिलांसाठी मॅमोग्राफी, पॅप स्मिअर, हीमोग्लोबिन तपासणी, डेंटल चेकअप तसेच इतर आवश्यक आरोग्य तपासण्या करण्यात आल्या.
या शिबिराचे मार्गदर्शन डॉ. वैशाली मोहिते यांनी केले. त्यांच्या नेतृत्वाखाली स्तन कॅन्सर व गर्भाशय मुखाच्या कॅन्सरच्या लवकर निदानासाठी मॅमोग्राफी व पॅप स्मिअर तपासण्या करण्यात आल्या. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. डिंपल जाधव यांनी महिलांना स्तन स्व-तपासणीबाबत मार्गदर्शन करून आरोग्याबाबत जागरूकता निर्माण केली.
याशिवाय डॉ. रशीद मानकर यांनी हीमोग्लोबिन तपासणी, डॉ. नेहा गोंगडे यांनी डेंटल तपासणी, डॉ. नेहा पाडवळ, डॉ. उज्वला माने, सौ. सुषमा शेटे तसेच श्री. विशाल मोहिटे यांनीही या शिबिरात मोलाची भूमिका बजावली.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी इनर व्हील क्लबच्या अध्यक्षा वर्षा पारटे तसेच रोटरी क्लबचे अध्यक्ष विजयजी काळे यांनी विशेष परिश्रम घेतले. याशिवाय इनरव्हीलच्या सपना अरोरा, मुक्ता कोमटी, अदिती भांगडिया, वंदना पलोड, राधा मुक्कावार, रमा पललोड, शुभांगी खुरासने, ज्योती पल्लोड, नेहा साळवी, गायत्री जाधव, लक्ष्मी येरलागड्डा, गीत नागपाल, मनीषा कोमटी तसेच रोटरीचे अनंत कुमार कोमटी, रमेशजी पल्लोड, धीरेन नागपाल, दिलीप रिंगे, डॉ. आशिष चोपडे, राजेश मुक्कावार, शिरीष गांधी, महेश कोमटी, दिनेश भिसे, स्वाती भांगडिया आदी सदस्यांनीही सक्रिय सहभाग नोंदवला. या शिबिरास पत्रकार बांधवांचीही उपस्थिती लाभली.
महिलांच्या आरोग्य जनजागृतीसाठी आणि कॅन्सरचे लवकर निदान करण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत असून, ग्रामीण भागातील महिलांना वेळेवर उपचार मिळण्यासाठी ही एक महत्त्वाची पायरी असल्याचे आयोजकांनी यावेळी नमूद केले.
Comments
Post a Comment