“वनसदृश्य जमिनीत पुन्हा घाव; कुंभरोशीतील सर्वे २५, २६ मध्ये वृक्षतोड आणि उत्खनन सुरूच”
“वनसदृश्य जमिनीत पुन्हा घाव; कुंभरोशीतील सर्वे २५, २६ मध्ये वृक्षतोड आणि उत्खनन सुरूच”
प्रतापगड प्रतिनिधी :
मौजे कुंभरोशी (ता. महाबळेश्वर) येथील सर्वे क्रमांक २५ व २६ या वनसदृश्य मिळकतीत सुरू असलेल्या वृक्षतोड आणि जमीन उत्खननाच्या प्रकाराने पुन्हा एकदा गंभीर वळण घेतले असून, पर्यावरणीय नियमांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापूर्वीही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या उत्खननाबाबत तक्रारी आणि बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र त्यानंतरही संबंधित ठिकाणी कोणतीही ठोस कारवाई झाल्याचे दिसून न आल्याने सध्या पुन्हा एकदा तेच प्रकार सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे.
सदर जमीन वनसदृश्य स्वरूपाची असल्याने येथे झाडांची कत्तल व मातीचे उत्खनन करण्यास कडक निर्बंध असतानाही प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. झाडे तोडून परिसर मोकळा करण्यात येत असून त्यानंतर JCB व इतर यंत्रांच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात मुरूम व माती काढली जात असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. या प्रकारामुळे परिसरातील नैसर्गिक समतोल बिघडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे, या ठिकाणी सुरू असलेल्या वृक्षतोड आणि उत्खननासाठी आवश्यक त्या वनविभाग, महसूल विभाग तसेच इतर संबंधित प्राधिकरणांची परवानगी घेण्यात आली आहे का, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. परिणामी हा प्रकार नियमबाह्य तर नाही ना, असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.
स्थानिकांच्या मते, या उत्खननामुळे मातीची धूप वाढण्याची शक्यता असून पावसाळ्यात भू-स्खलनाचा धोका निर्माण होऊ शकतो. तसेच परिसरातील जलस्रोतांवरही याचा विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वनसंपदा नष्ट होण्यासोबतच जैवविविधतेवरही याचा परिणाम होऊ शकतो, अशी चिंता पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.
या प्रकरणी यापूर्वी संबंधित विभागांकडे तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे आता प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी करावी, संबंधित कागदपत्रांची पडताळणी करावी आणि जर हा प्रकार बेकायदेशीर आढळला तर संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
Comments
Post a Comment