प्रतापगडाच्या साक्षीने पार्वतीपूर पारमध्ये भक्तीचा महासागर; शिवकालीन परंपरेत रंगला श्रीरामवरदायिनी देवीचा भव्य बगाड सोहळा”

“प्रतापगडाच्या साक्षीने पार्वतीपूर पारमध्ये भक्तीचा महासागर; शिवकालीन परंपरेत रंगला श्रीरामवरदायिनी देवीचा भव्य बगाड सोहळा”

प्रतापगड प्रतिनिधी: 

सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या आणि ऐतिहासिक किल्ले प्रतापगड च्या पायथ्याशी असलेल्या श्रीक्षेत्र पार्वतीपूर पार येथे श्रीरामवरदायिनी देवीची वार्षिक बगाड यात्रा यंदा अभूतपूर्व उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली. ‘शिव हर, हर महादेव’ आणि ‘वरदायिनी आईचं चांग भलं’ या जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. सात दिवस चालणाऱ्या या यात्रोत्सवाची भव्य सुरुवात पारंपरिक बगाड सोहळ्याने झाली.

परिसरातील तब्बल ८४ गावांचे श्रद्धास्थान असलेल्या या यात्रेला शिवकालीन परंपरेचा ठसा लाभलेला आहे. इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज स्वतः या यात्रेला उपस्थित राहत असत, अशी मान्यता असून आजही ती परंपरा जपली जात आहे. प्रतापगडावरून शिवरायांच्या स्वारीचे प्रतीकात्मक आगमन झाल्यानंतरच बगाड सोहळ्याला सुरुवात होते. यावर्षीही या परंपरेनुसार स्वारीच्या आगमनाने भाविकांमध्ये प्रचंड उत्साह आणि श्रद्धा पाहायला मिळाली.

यात्रेतील मुख्य आकर्षण असलेल्या बगाड सोहळ्यासाठी शेजारील बिरमणी गावातून लाट आणण्याची पारंपरिक पद्धत आजही कायम आहे. मंदिरासमोरील पुरातन लाकडी खांबावर ही लाट चढवून तिला वर्तुळाकार फेरे देण्यात आले. या वेळी विविध गावांतील देवी-देवतांच्या मानाच्या सासन काठ्यांचे आगमन झाले. ढोल-ताशांच्या गजरात, गुलाल व खोबऱ्याच्या उधळणीत हा सोहळा अत्यंत थरारक वातावरणात पार पडला. महाराष्ट्राच्या विविध भागांतून हजारो भाविक या सोहळ्याला उपस्थित राहिले होते.

यात्रेतील सांस्कृतिक रंगतही यंदा विशेष ठरली. देवस्थान ट्रस्ट पारसोंड व ग्रामस्थ मंडळी पार्वतीपूर पार यांच्या वतीने मंदिर परिसरात साकारण्यात आलेली आकर्षक रांगोळी भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. भक्ती आणि कलेचा सुंदर संगम साधणाऱ्या या रांगोळीने सोहळ्याला वेगळीच शोभा प्राप्त झाली. तसेच प्रतापगड येथील श्री चंदू आप्पा उतेकर यांच्या ‘स्वराज्य ढोल पथका’ने सादर केलेल्या दमदार वादनाने वातावरणात उत्साहाची भर पडली.

बगाड सोहळ्याने यात्रोत्सवाची सुरुवात झाली असली तरी पुढील सात दिवस येथे विविध धार्मिक विधी, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रमांची रेलचेल राहणार आहे. या सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान ट्रस्ट आणि पार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

श्रीरामवरदायिनी देवीच्या या यात्रोत्सवाने केवळ धार्मिक परंपरेचे जतनच नव्हे, तर समाजातील एकोपा, श्रद्धा आणि सांस्कृतिक वारसा जपण्याची प्रेरणादेखील पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl