वडिलांसाठी जेवण घेऊन निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू; जावळी तालुक्यात शोककळा
वडिलांसाठी जेवण घेऊन निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू; जावळी तालुक्यात शोककळा
मेढा प्रतिनिधी :
वडिलांवर उपचार सुरू असताना त्यांना जेवण पोहोचवण्यासाठी निघालेल्या तरुणाचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना जावळी तालुक्यात घडली आहे. दिपक आनंदा कांबळे (वय २६, रा. डांगरेघर ता. जावळी) असे मृत तरुणाचे नाव असून भणंग गावाच्या हद्दीत झालेल्या भीषण अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे केळघर व मेढा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिपक कांबळे हा मेढा येथून साताऱ्याकडे स्कुटीवरून जात होता. भणंग गावाजवळील माऊली हॉल परिसरात समोरून येणाऱ्या टाटा पंच (एमएच ०८ बीई ८४२६) या चारचाकी वाहनाने त्याच्या स्कुटीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दिपकचा जागीच मृत्यू झाला.
विशेष म्हणजे, दिपकचे वडील सातारा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. त्यांना जेवण देण्यासाठी तो निघाला होता. मात्र दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघाताने त्याच्या आयुष्याचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेची माहिती मिळताच मित्र व नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी केली होती.
दिपक हा स्वभावाने अत्यंत मनमिळावू, सर्वांशी मिळून मिसळून राहणारा आणि मित्रपरिवारात लोकप्रिय होता. बैल शर्यतीची त्याला विशेष आवड होती, अशी माहिती त्याच्या मित्रांनी दिली. त्याच्या अकाली निधनामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
दरम्यान, या प्रकरणी मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून संबंधित चारचाकी वाहन चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
सातारा-केळघर मार्ग हा अपघातांचा धोकादायक पट्टा ठरत चालल्याचे पुन्हा एकदा या घटनेतून समोर आले आहे. रस्त्यालगत गावे, शाळा आणि महाविद्यालये असतानाही वाहनचालक वेगमर्यादेचे पालन करत नसल्याने अपघातांची मालिका सुरूच आहे. या मार्गावर झेब्रा क्रॉसिंग, गतीरोधक तसेच वाहतूक नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
Comments
Post a Comment