सरपंच परिषदेचे अध्यक्ष जितेंद्र भोसले शिवसेनेत; प्रवक्तेपदी नियुक्ती, राज्यभर राजकीय चर्चांना उधाण
सरपंच परिषदेचे अध्यक्ष जितेंद्र भोसले शिवसेनेत; प्रवक्तेपदी नियुक्ती, राज्यभर राजकीय चर्चांना उधाण
विजय जाधव ,
सातारा प्रतिनिधी :
ग्रामविकासाच्या प्रश्नांवर राज्यभर आवाज उठवत सरपंचांना एकत्रित करणारे नागझरी (ता. कोरेगाव) येथील माजी सरपंच तथा सरपंच परिषद, पुणेचे अध्यक्ष जितेंद्र भोसले यांनी अखेर शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. साताऱ्यातील गांधी मैदानावर रविवारी दि. १९ एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भव्य प्रवेश सोहळा पार पडला. भोसले यांच्या प्रवेशानंतर लगेचच त्यांची शिवसेनेच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
२०१७ पासून ‘सरपंच परिषद’ या संघटनेच्या माध्यमातून भोसले यांनी राज्यभरातील शेकडो सरपंचांना एकत्र आणत एक मजबूत व्यासपीठ उभे केले आहे. ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अडचणी, सरपंचांचे हक्क आणि ग्रामविकासाचे मुद्दे प्रभावीपणे मांडत त्यांनी राज्यस्तरावर ओळख निर्माण केली. त्यांच्या नेतृत्वाखाली जलसंधारण, ‘जलयुक्त गाव’ संकल्पना आणि लोकसहभागातून विकासकामे राबवत नागझरी गावाला एक आदर्श गाव म्हणून ओळख मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
शिवसेनेत प्रवेश करताना भोसले यांनी स्पष्ट केले की, “गावविकासासाठी सत्तेच्या मुख्य प्रवाहात राहणे गरजेचे आहे. विकासाच्या नव्या पर्वाची ही सुरुवात असून राज्यभरातील सरपंच आता संघटितपणे गावांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत राहतील.” त्यांच्या या भूमिकेमुळे ग्रामीण भागातील नेतृत्वाला नवी दिशा मिळणार असल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, भोसले यांच्या नेतृत्वाखालील सरपंच परिषदेचे जाळे राज्यातील जवळपास प्रत्येक जिल्ह्यात विस्तारले असून या माध्यमातून सरपंचांच्या मानधनवाढीपासून ते ग्रामपंचायतीच्या कारभारातील विविध प्रश्नांवर त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. कार्यकाळ संपल्यानंतर प्रशासक म्हणून विद्यमान सरपंचांची नियुक्ती व्हावी, यासाठी त्यांनी शासनाला कायदेशीर चौकटीत राहून भाग पाडल्याचेही त्यांच्या कार्याचा एक महत्त्वाचा पैलू मानला जातो.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भोसले यांच्या नेतृत्वगुणांची दखल घेत त्यांना शिवसेनेत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार परिषदेच्या सदस्यांनीही गावविकासासाठी सत्तेसोबत राहण्याचा निर्णय घेतला. साताऱ्यातील प्रवेश सोहळ्यात मोठ्या संख्येने सरपंच उपस्थित राहिल्याने हा केवळ वैयक्तिक पक्षप्रवेश न राहता एक संघटनात्मक शक्तीचा दाखला ठरला.
भोसले यांच्या नियुक्तीनंतर शिवसेनेला ग्रामीण भागात विशेषतः सरपंचांच्या माध्यमातून मजबूत आधार मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. राज्यभरातील सरपंच भगव्या झेंड्याखाली एकवटल्यास आगामी राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ग्रामीण नेतृत्वाला व्यासपीठ देणारा हा निर्णय शिवसेनेच्या विस्तारासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.
Comments
Post a Comment