सातारा जिल्ह्यात आरटीओचा महसूल विक्रम; ३३१ कोटी ४१ लाखांची तिजोरीत भर

सातारा जिल्ह्यात आरटीओचा महसूल विक्रम; ३३१ कोटी ४१ लाखांची तिजोरीत भर

विजय जाधव – गोडोली प्रतिनिधी 

सातारा जिल्ह्यातील प्रादेशिक परिवहन विभागाने गत आर्थिक वर्षात महसूल वसुलीत उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल ३३१ कोटी ४१ लाख रुपयांचा विक्रमी महसूल शासनाच्या तिजोरीत जमा केला आहे. सातारा प्रादेशिक परिवहन कार्यालयासह कराड आणि फलटण उपप्रादेशिक कार्यालयांनी विविध सेवांमधून ही भरीव वसुली साध्य केली असून, विभागाच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

प्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन वाहन नोंदणी, आकर्षक वाहन क्रमांकांची निवड, वाहन परवाना शुल्क तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर करण्यात आलेल्या दंडात्मक कारवाया या माध्यमांतून महसूल जमा करण्यात आला. २०२५-२६ या आर्थिक वर्षात सातारा प्रादेशिक कार्यालयाने सर्वाधिक २०८ कोटी ६९ लाख रुपयांचा महसूल जमा केला असून, कराड उपप्रादेशिक कार्यालयाने ८० कोटी ९६ लाख आणि फलटण कार्यालयाने ४१ कोटी ७६ लाख रुपयांची वसुली केली आहे.

दरम्यान, आकर्षक वाहन क्रमांक घेण्याकडे नागरिकांचा वाढता कल स्पष्टपणे दिसून आला आहे. जिल्ह्यातील तब्बल ८६६४ वाहनधारकांनी विशेष क्रमांक नोंदणीचा पर्याय निवडत १० कोटी १६ लाख ३५ हजार रुपयांचा महसूल जमा केला आहे. ही बाब परिवहन विभागासाठी अतिरिक्त उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत ठरत आहे.

इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरातही लक्षणीय वाढ होत असल्याचे चित्र यंदा पाहायला मिळाले. सातारा येथे ३९९७, कराडमध्ये १४२२ आणि फलटणमध्ये ११३१ अशा एकूण ६५५० इलेक्ट्रिक वाहनांची नोंद झाली आहे. पर्यावरणपूरक वाहनांकडे नागरिकांचा वाढता कल अधोरेखित करणारा हा आकडा मानला जात आहे.

नवीन वाहन नोंदणीच्या बाबतीतही जिल्ह्यात मोठी वाढ झाली असून सातारा येथे ५० हजार ८९, कराडमध्ये २१ हजार ३९१ आणि फलटणमध्ये १४ हजार ६७३ अशी एकूण ८६ हजार १५३ नवीन वाहनांची भर पडली आहे. या वाढत्या वाहनसंख्येमुळे महसूल वसुलीतही मोठी भर पडल्याचे स्पष्ट झाले आहे.

या सर्व कामगिरीमुळे परिवहन विभागाने आपले वार्षिक उद्दिष्ट जवळपास पूर्ण करत शासनाच्या उत्पन्नात भरीव योगदान दिले आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून आणि कार्यक्षमतेतून ही यशस्वी वसुली शक्य झाल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले यांनी नमूद केले आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl