आंबेनळी घाटात थरारक रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी; ७०० फूट दरीत कोसळलेल्या दांपत्याचे मृतदेह अखेर बाहेर

आंबेनळी घाटात थरारक रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी; ७०० फूट दरीत कोसळलेल्या दांपत्याचे मृतदेह अखेर बाहेर

प्रतापगड प्रतिनिधी :

आंबेनळी घाट येथे झालेल्या भीषण अपघातानंतर सुरू असलेली थरारक बचाव मोहीम अखेर यशस्वी ठरली असून ७०० फूट खोल दरीत कोसळलेल्या बाईकस्वार दांपत्याचे मृतदेह बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश आले आहे. दोन दिवस चाललेल्या या अत्यंत कठीण आणि जीवघेण्या मोहिमेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


महाबळेश्वर तालुक्यातील कुंभरोशी गावाजवळ, पोलादपूर हद्दीत हा अपघात घडला. दिनांक २३ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे सात वाजता प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमचे सदस्य अमित जाधव यांना घाटातील एका धोकादायक वळणावर रस्त्याच्या कडेला संशयास्पद अवस्थेत स्प्लेंडर मोटारसायकल आढळली. बाईक बॅरिकेट्समध्ये अडकलेली असल्याने अपघाताची शक्यता लक्षात येताच त्यांनी तत्काळ सहकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम आणि महाबळेश्वर ट्रेकर्सच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली.

रेस्क्यू टीमने दोरांच्या साहाय्याने सुमारे ७०० फूट खोल दरीत उतरून अत्यंत धोकादायक परिस्थितीत शोधकार्य सुरू केले. अंधार, निसरडे उतार, दाट धुके आणि सुरू असलेला पाऊस यामुळे ही मोहीम अत्यंत कठीण बनली होती. रात्री सुमारे दीड वाजेपर्यंत सुरू असलेल्या अथक प्रयत्नांनंतर प्रथम पुरुषाचा मृतदेह शोधून बाहेर काढण्यात यश आले. मात्र प्रतिकूल हवामान आणि वाढत्या धोक्यामुळे उर्वरित बचावकार्य थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला.

यानंतर आज सकाळी सुमारे नऊ वाजता पुन्हा बचावमोहीम सुरू करण्यात आली. नव्या उत्साहाने आणि अधिक नियोजनपूर्वक सुरू झालेल्या या मोहिमेत तब्बल तीन तासांच्या अथक मेहनतीनंतर महिलेचा मृतदेहही दरीतून बाहेर काढण्यात यश आले. यामुळे संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन यशस्वीरीत्या पूर्ण झाले.

या दुर्घटनेत मृतांची ओळख मोहन चव्हाण (वय ५५) आणि जयश्री चव्हाण (वय ४८, रा. सोनगिरवाडी) अशी झाली आहे. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.

या थरारक बचावकार्यात महाबळेश्वर ट्रेकर्सचे बाबा भाटिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमचे अजित जाधव, अमित जाधव, ऋषी जाधव, मुन्ना उत्तेकर, दादू बिरामणे, अनिकेत वाघदरे, सौरभ गोळे, संकेत सावंत, सौरभ सालेकर, ओमकार सोनवणे, शरद सावंत, अमित कोळी, सुजित कोळी, दीपक ओंबळे, अखिल शेटे, आशिष बिरामणे, बाबू वाघदरे, सोमनाथ वाघदरे, रोहन जंगम, संगीता कोळी यांनी जीव धोक्यात घालून मोलाचे योगदान दिले.

घटनेची माहिती मिळताच पोलादपूर व महाबळेश्वर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी महाबळेश्वरचे नगरसेवक कुमार शिंदे, पोलादपूरचे तहसीलदार कपिल घोरपडे, स्वप्निल कदम तसेच कुंभरोशी व प्रतापगड परिसरातील युवक कार्यकर्त्यांनीही रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी उपस्थित राहून सहकार्य केले.

आंबेनळी घाट हा तीव्र वळणे, खोल दऱ्या आणि निसरडा रस्ता यामुळे अतिशय धोकादायक म्हणून ओळखला जातो. विशेषतः पावसाळ्यात येथे अपघातांची शक्यता अधिक वाढते. त्यामुळे वाहनचालकांनी या मार्गावरून प्रवास करताना वेग मर्यादित ठेवावा, सतर्कता बाळगावी आणि वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

या प्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl