“गंभीर गुन्ह्यांतील आरोपी भरत मालुसरे दोन वर्षांसाठी सातारा जिल्ह्यातून तडीपार; पाचगणी पोलिसांची ठोस कारवाई”
“गंभीर गुन्ह्यांतील आरोपी भरत मालुसरे दोन वर्षांसाठी सातारा जिल्ह्यातून तडीपार; पाचगणी पोलिसांची ठोस कारवाई”
पाचगणी प्रतिनिधी :
पाचगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार भरत तुकाराम मालुसरे याला सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचा आदेश देण्यात आला असून, या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. सार्वजनिक शांतता आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.
गोडवली (पो. खिंगर), ता. महाबळेश्वर, जि. सातारा येथील रहिवासी असलेल्या भरत मालुसरे याच्याविरुद्ध यापूर्वी पाचगणी पोलीस ठाण्यात शरीराविरुद्ध तसेच मालमत्तेविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते. त्याच्या वारंवार गुन्हेगारी वर्तनामुळे परिसरातील सर्वसामान्य नागरिक भयभीत झाले होते आणि दहशतीच्या वातावरणात दैनंदिन जीवन जगत होते.
या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांना दिलासा मिळावा आणि परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पाचगणी पोलिसांनी त्याच्या हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाची सखोल पडताळणी उपविभागीय पोलीस अधिकारी, वाई विभाग यांनी करून साक्षीदारांची खातरजमा केली. त्यानंतर हा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी, वाई यांच्याकडे पाठवण्यात आला.
उपविभागीय दंडाधिकारी श्री. योगेश खरमाटे यांनी आदेश क्रमांक एमएजी/हद्दपार/एसआर ०६/२०२५ (दि. १० एप्रिल २०२६) अन्वये भरत तुकाराम मालुसरे याला सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचा आदेश पारित केला आहे. या आदेशानुसार संबंधित इसमाला जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.
पाचगणी पोलिसांनी केलेल्या या ठोस कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, “दहशतीतून मुक्ती मिळाली” अशी भावना व्यक्त होत आहे. तसेच, सार्वजनिक शांततेला बाधा आणणाऱ्या इतर इसमांवरही अशाच प्रकारची हद्दपार कारवाई प्रस्तावित असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहनही करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पाचगणी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पोलीस उपनिरीक्षक बालाजी सोनुने, तसेच पोलीस हवालदार श्रीकांत कांबळे यांनी या कारवाईत सक्रिय सहभाग घेतला. उत्कृष्ट कामगिरीबद्दल संबंधित पथकाचे पोलीस अधीक्षकांनी अभिनंदन केले आहे.
Comments
Post a Comment