आंबेनळी घाटात थरारक रेस्क्यू; मृतदेह बाहेर काढताना रात्री अडथळा बचावकार्य थांबले, आज पुन्हा सुरू होणार मोहीम
आंबेनळी घाटात थरारक रेस्क्यू; मृतदेह बाहेर काढताना रात्री अडथळा बचावकार्य थांबले, आज पुन्हा सुरू होणार मोहीम
प्रतापगड प्रतिनिधी :
महाबळेश्वर तालुक्यातील कुंभरोशी गावाजवळ, पोलादपूर हद्दीतील आंबेनळी घाटात झालेल्या भीषण अपघातात बाईकस्वार दांपत्याचा सुमारे ७०० फूट खोल दरीत कोसळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. अंधार, अवकाळी पाऊस आणि दाट धुके यामुळे सुरू असलेले बचावकार्य अखेर रात्री सुमारे १.३० वाजता थांबवावे लागल्याने या दुर्घटनेची गंभीरता अधिक अधोरेखित झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २३ एप्रिल रोजी प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमचे सदस्य अमित जाधव हे पोलादपूर ते प्रतापगड मार्गावरून जात असताना आंबेनळी घाटातील एका अतिधोकादायक वळणावर रस्त्याच्या कडेला एक स्प्लेंडर मोटारसायकल संशयास्पद स्थितीत आढळून आली. बाईक बॅरिकेट्समध्ये अडकलेली असल्याने अपघाताची शक्यता लक्षात येताच त्यांनी तत्काळ प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम आणि महाबळेश्वर ट्रेकर्सच्या सदस्यांना माहिती दिली. यानंतर दोन्ही पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली आणि शोधमोहीम सुरू करण्यात आली.
रेस्क्यू टीमने दोरांच्या साहाय्याने सुमारे ७०० फूट खोल दरीत उतरून अत्यंत धोकादायक परिस्थितीत शोधकार्य सुरू केले. संबंधित व्यक्ती नेमक्या कुठे कोसळल्या याची कोणतीही स्पष्ट माहिती नसल्याने अंधारात आणि निसरड्या उतारांमध्ये शोधमोहीम राबवावी लागत होती. अखेर काही तासांच्या अथक प्रयत्नांनंतर प्रथम पुरुषाचा मृतदेह शोधण्यात यश आले. त्यानंतर सुमारे १५० फूट खाली महिलेचा मृतदेह आढळून आला.
मृतांची ओळख मोहन चव्हाण (वय ५५) आणि जयश्री चव्हाण (वय ४८, रा. सोनगिरवाडी) अशी झाली असून या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू असतानाच अंधार, मुसळधार पाऊस आणि दाट धुके यामुळे बचावकार्याला मोठा अडथळा निर्माण झाला. निसरड्या कड्यांमुळे आणि कमी दृश्यमानतेमुळे टीमच्या सदस्यांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याने प्रथम पुरुषाचा मृतदेह बाहेर काढण्यावर भर देण्यात आला. मात्र प्रतिकूल परिस्थितीमुळे महिलेचा मृतदेह बाहेर काढणे शक्य झाले नाही. अखेर परिस्थितीचा विचार करून रात्री सुमारे १.३० वाजता बचावकार्य थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढील दिवशी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस व महाबळेश्वर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी बचावकार्यात सक्रिय सहभाग घेतला. स्थानिक प्रशासन, पोलीस आणि स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयातून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात आले आहे.
आंबेनळी घाट हा अतिशय धोकादायक वळणांचा आणि खोल दऱ्यांचा घाट म्हणून ओळखला जातो. विशेषतः पावसाळ्यात येथे रस्ता घसरडा होऊन अपघातांची शक्यता वाढते. त्यामुळे वाहनचालकांनी या मार्गावरून प्रवास करताना विशेष काळजी घ्यावी, वेग मर्यादित ठेवावा आणि वाहतुकीचे नियम पाळावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
या प्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
Comments
Post a Comment