तापोळा नगरीत भक्तिरसाचा महासागर; ‘अखंड हरिनाम सप्ताह’ व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला मंगलमय प्रारंभ
तापोळा नगरीत भक्तिरसाचा महासागर; ‘अखंड हरिनाम सप्ताह’ व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला मंगलमय प्रारंभ
✍️संतोष मालुसरे,
तापोळा प्रतिनिधी :
निसर्गरम्य तापोळा नगरीत ‘अखंड हरिनाम सप्ताह’ आणि ‘ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळ्या’चा अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ झाला आहे. प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबेघर परिसराच्या आध्यात्मिक परंपरेची प्रेरणा घेत यंदा या महोत्सवाचे ३१ वे वर्ष साजरे होत असून शुक्रवार, दि. ३ एप्रिल २०२६ पासून या सोहळ्याला सुरुवात झाली आहे.
ह.भ.प. वैकुंठवासी हरिभाऊ गुरुजी निपाणी यांच्या कृपाशिर्वादाने आणि ह.भ.प. श्री. प्रविण महाराज शेलार (श्री विठ्ठलधाम, आंबेघर) यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह पार पडत आहे. तापोळ्यातील ग्रामस्थ मंडळ, व्यापारी मंडळ, नवरात्र उत्सव मंडळ, राजा शिवछत्रपती युवा मंडळ आणि दुर्गामाता महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला आहे.
सप्ताहाच्या कालावधीत दररोज पहाटे ५ वाजता काकड आरतीने दिवसाची सुरुवात होत असून सकाळी ७.३० ते ११ आणि दुपारी २ ते ४ या वेळेत श्री ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण वाचन सुरू असते. सायंकाळी प्रवचन आणि हरिपाठाने वातावरण अधिक भारावते, तर रात्री नामांकित कीर्तनकारांच्या कीर्तनांनी भाविक मंत्रमुग्ध होतात. उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या भजनी मंडळांच्या जागरामुळे तापोळा नगरीत अखंड नामस्मरणाचा गजर घुमत आहे.
या सप्ताहात महाराष्ट्रातील नामवंत प्रवचनकार व कीर्तनकारांची मांदियाळी लाभली आहे. ह.भ.प. नंदिनीताई धनावडे, ह.भ.प. गायत्रीताई महाराज धायवट, ह.भ.प. भाऊसाहेब महाराज कडेगाव, ह.भ.प. विनोद महाराज जाधव आणि ह.भ.प. डॉ. प्रविण दुशिंग पाटील यांचे शिवचरित्रपर कीर्तन भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे.
सप्ताहादरम्यान भाविकांसाठी अन्नदानाचीही उत्तम व्यवस्था करण्यात आली असून सकाळचा नाश्ता, दुपारचे व सायंकाळचे जेवण स्थानिक दानशूर नागरिकांकडून दिले जात आहे. मंगळवार, दि. ७ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता ह.भ.प. प्रविण महाराज शेलार यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होणार असून दुपारी २ वाजता भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
दूरवरून येणाऱ्या भाविकांची सोय लक्षात घेऊन आयोजकांनी वाहनांची विशेष व्यवस्था केली आहे. या सोहळ्याचे नियोजन अध्यक्ष तुकाराम ल. धनावडे, उपाध्यक्ष वसंत सि. धनावडे, खजिनदार शंकर कों. धनावडे, सचिव रघुनाथ रा. धनावडे तसेच सर्व ग्रामस्थ व तरुण मंडळ यांच्या संयुक्त प्रयत्नातून सुरळीतपणे पार पडत आहे.
तापोळा परिसरातील सर्व भाविकांनी या भक्तिमय सप्ताहाचा लाभ घेऊन नामस्मरण, प्रवचन आणि महाप्रसादाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. संपूर्ण परिसरात “जय जय राम कृष्ण हरी”च्या गजरात भक्ती, एकात्मता आणि आध्यात्मिकतेचा अनोखा संगम अनुभवायला मिळत आहे.
Comments
Post a Comment