आपटीत अखंड हरिनाम सप्ताहाचा भक्तीमय सोहळा; ज्ञानेश्वरी पारायण, कीर्तन-प्रवचनांनी परिसर दुमदुमला

आपटीत अखंड हरिनाम सप्ताहाचा भक्तीमय सोहळा; ज्ञानेश्वरी पारायण, कीर्तन-प्रवचनांनी परिसर दुमदुमला

तापोळा प्रतिनिधी:

सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील मौजे आपटी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळ्याचे भक्तीपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले आहे. वैशाख शुद्ध तृतीया, अक्षय तृतीया (१९ एप्रिल २०२६) पासून सुरू झालेला हा सप्ताह वैशाख शुद्ध सप्तमी (२३ एप्रिल २०२६) रोजी समारोपास येणार असून संपूर्ण परिसरात हरिनामाचा गजर घुमत आहे.


वैकुंठवासी ह.भ.प. चिमाजी यशवंत कदम आणि ह.भ.प. हरिभाऊ गुरुजी निपाणी यांच्या कृपाशिर्वादाने तसेच कै. सखाराम हरिबा कदम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ह.भ.प. आनंद महाराज कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थ मंडळ, श्री साई युवा मंडळ आणि नवरुण ग्राम विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

सोहळ्याच्या उद्घाटनासाठी ह.भ.प. कोंडीबा लक्ष्मण कदम, सरपंच बाबुराव शिंदे आणि अग्निवीर जवान सुशांत कदम उपस्थित राहणार असून दीपप्रज्वलन पोलीस पाटील शामराव गायकवाड यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमात मृदंगमणी म्हणून माउली महाराज गायकवाड (परभणी) तर गायक म्हणून बाळकृष्ण महाराज सुरासे, आनंद महाराज कदम आणि विजय महाराज कदम सेवा देत आहेत.

दररोज पहाटे काकड आरतीने दिवसाची सुरुवात होत असून सकाळी आणि दुपारी ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी प्रवचन व हरिपाठ, तर रात्री कीर्तन आणि जागर असा कार्यक्रमाचा क्रम ठेवण्यात आला आहे. विविध नामवंत कीर्तनकार व प्रवचनकार यांच्या उपस्थितीत आध्यात्मिक वातावरण अधिकच भारलेले आहे. दररोज वेगवेगळ्या गावांच्या सहभागातून हरिजागर पार पडत असून भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

बुधवारी (२२ एप्रिल) सकाळी दिंडी सोहळा व महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच शुक्रवारी (२४ एप्रिल) जननीमाता वार्षिक श्री सत्यनारायण महापूजाही पार पडणार आहे.

या सोहळ्यासाठी अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती अपेक्षित आहे. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्तेही मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.

भोजन व्यवस्थाही ग्रामस्थांच्या सहकार्याने करण्यात आली असून दररोज सकाळचा नाश्ता, दुपारची व सायंकाळची पंगत भक्तांसाठी उपलब्ध आहे. विविध दात्यांनी आपल्या कुटुंबीयांच्या स्मरणार्थ अन्नदानाचा मान स्वीकारला आहे.

संपूर्ण सप्ताहात आपटी गावात भक्ती, एकात्मता आणि सामाजिक ऐक्याचे दर्शन घडत असून “जय जय राम कृष्ण हरी”च्या घोषणांनी वातावरण दुमदुमले आहे. आयोजकांनी सर्व भाविकांना या आध्यात्मिक सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl