“परवान्यासाठी ५० हजारांची लाच; सातारा जिल्हा रुग्णालयातील शिपाई एसीबीच्या जाळ्यात”
“परवान्यासाठी ५० हजारांची लाच; सातारा जिल्हा रुग्णालयातील शिपाई एसीबीच्या जाळ्यात”
सातारा प्रतिनिधी :
सोनोग्राफी सेंटर, गर्भपात केंद्र आणि कुटुंब नियोजन केंद्राच्या परवान्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या सातारा जिल्हा रुग्णालयातील एका शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहात अटक केली. ही कारवाई झाल्यानंतर आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली असून, सरकारी कार्यालयांमधील भ्रष्टाचार पुन्हा एकदा उघड झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तक्रारदाराने आपल्या केंद्राच्या परवान्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाशी संपर्क साधला होता. यावेळी संबंधित शिपायाने जिल्हा शल्यचिकित्सकांच्या वतीने काम करून देण्याचे सांगत ५० हजार रुपयांची मागणी केली. ही रक्कम दिल्यास आवश्यक परवानग्या मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.
तक्रारदाराने याबाबत तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. ठरलेल्या ठिकाणी शिपायाने तक्रारदाराकडून ५० हजार रुपये स्वीकारताच पथकाने त्याला रंगेहात पकडले.
या कारवाईमुळे जिल्हा रुग्णालयातील प्रशासकीय कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, संबंधित अधिकाऱ्यांची भूमिकाही तपासली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या शिपायाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेनंतर “सरकारी कामासाठी लाच मागितली जात असल्यास नागरिकांनी पुढे येऊन तक्रार करावी,” असे आवाहन एसीबीकडून करण्यात आले आहे. नागरिकांनी धाडस दाखवून तक्रारी केल्यास अशा भ्रष्ट प्रवृत्तींवर आळा घालता येईल, असा विश्वासही अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
Comments
Post a Comment