आंबेनळी घाट रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती होणार का? प्रवासी व ग्रामस्थांचा सवाल
आंबेनळी घाट रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती होणार का? प्रवासी व ग्रामस्थांचा सवाल
प्रतापगड प्रतिनिधी :
महाबळेश्वर तालुक्यातील प्रसिद्ध आंबेनळी घाट मार्ग सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत असून महाबळेश्वर ते मेटतळे दरम्यान अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. मागील पावसाळ्यात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे रस्त्यावर खोलगट भाग तयार झाले असून काही ठिकाणी रस्त्याचे मोठे थरच निघून गेले आहेत. विशेष म्हणजे पावसाळा संपून हिवाळा आणि उन्हाळाही जवळपास संपत आला तरीही या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही, यामुळे वाहनचालक आणि प्रवासी प्रचंड त्रस्त झाले आहेत.
आंबेनळी घाट हा महाबळेश्वरहून प्रतापगड तसेच कोकणात जाण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग मानला जातो. वर्षभर या मार्गावरून पर्यटकांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. यासोबतच स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थी आणि व्यावसायिक यांनाही याच रस्त्यावरून प्रवास करावा लागतो. मात्र सध्या रस्त्याची अवस्था इतकी खराब झाली आहे की वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. अनेक ठिकाणी खड्डे चुकवताना अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, मागील वर्षी पावसाळ्यातच रस्त्याची मोठ्या प्रमाणावर हानी झाली होती. त्यानंतर तात्पुरती दुरुस्ती देखील करण्यात आलेली नाही. परिणामी उन्हाळ्याच्या काळातही रस्त्यावरील खड्डे कायम आहेत. आता काही दिवसांतच पुन्हा पावसाळा सुरू होणार असल्याने परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ग्रामस्थ आणि प्रवाशांनी प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली असून पावसाळ्यापूर्वीच रस्ता खड्डेमुक्त करून सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे. अन्यथा आगामी पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक धोकादायक ठरण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
Comments
Post a Comment