गवडी येथे आगीचा कहर; झोपडीसह जनावरांचे व शेतीचे मोठे नुकसान, सुमारे ६० हजारांचा फटका
गवडी येथे आगीचा कहर; झोपडीसह जनावरांचे व शेतीचे मोठे नुकसान, सुमारे ६० हजारांचा फटका
मेढा प्रतिनिधी :
जावली तालुक्यातील गवडी (पाटीलवाडी) येथे शुक्रवारी दुपारच्या सुमारास लागलेल्या अचानक आगीत शेतातील झोपडी, जनावरे व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी संबंधित कुटुंबाचा संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाला असून अंदाजे ५० ते ६० हजार रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गवडी येथील शेतकरी धोंडीराम लक्ष्मण पाटणे यांच्या शेतामध्ये माचूतर येथील स्ट्रॉबेरी उत्पादक फातिमा उसेन नालबंद (वय ५५) व उसेन कासम नालबंद (वय ६०) हे भाडेतत्त्वावर शेती करत होते. शेतीकामासाठी त्यांनी शेतामध्येच गवती छपराची झोपडी उभारून वास्तव्य केले होते. शुक्रवारी सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास अचानक झोपडीला आग लागली. आगीचे नेमके कारण समजू शकले नसले तरी काही क्षणातच आगीने भीषण रूप धारण केले.
आग लागल्याचे लक्षात येताच दोघांनी तत्काळ प्रयत्न करून आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र झोपडी पूर्णपणे ज्वाळांच्या भक्ष्यस्थानी पडली. या आगीत अंगावरील कपडे, अंथरूण-पांघरूण, सुमारे १ क्विंटल गहू, ३५ किलो तांदूळ, घरगुती भांडी व संसारोपयोगी साहित्य, तसेच रोख रक्कम जळून खाक झाली. याशिवाय झोपडीत बांधलेले अंदाजे १४ महिन्यांचे गाईचे वासरू जळून मृत्यूमुखी पडले, तर गाय व कालवड गंभीररीत्या भाजून जखमी झाले आहेत. तसेच स्ट्रॉबेरी शेतीचेही मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस पाटील रविंद्र चव्हाण, तलाठी कर्चे अण्णासाहेब, ग्रामसेवक रवींद्र निकम, कर्मचारी सचिन धनावडे यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्वांनी मिळून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला व आग आटोक्यात आणण्यात यश आले. तलाठी कार्यालयाकडून घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून पंचांच्या अंदाजानुसार सुमारे ४९,७०० रुपयांचे नुकसान नोंदवण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्ष नुकसान ६० हजार रुपयांच्या आसपास असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
या घटनेमुळे संबंधित कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने तात्काळ मदत जाहीर करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थ व स्थानिक प्रशासनाकडे करण्यात येत आहे.
▢ नुकसानाचा तपशील (पंचनामा अनुसार)
अंगावरील कपडे व अंथरूण-पांघरूण – ₹४,५००
गहू (१ क्विंटल) – ₹२,१००
तांदूळ (३५ कि.ग्रॅ.) – ₹२,१००
संसारोपयोगी साहित्य – ₹७,५००
देशी गाईचे वासरू (मयत) – ₹१४,०००
गाय व कालवड (जखमी) – ₹३,५००
रोख रक्कम – ₹१५,०००
एकूण नुकसान – ₹४९,७०० (अंदाजे)
Comments
Post a Comment