आंबेनळी घाटात भीषण अपघाताची शक्यता; बाईक बॅरिकेट्समध्ये अडकली, प्रवासी दरीत कोसळल्याचा संशय
आंबेनळी घाटात भीषण अपघाताची शक्यता; बाईक बॅरिकेट्समध्ये अडकली, प्रवासी दरीत कोसळल्याचा संशय
प्रतापगड प्रतिनिधी दि. २३ : महाबळेश्वर तालुक्यातील कुंभरोशी गावापासून साधारण एक किलोमीटर अंतरावर पोलादपूर हद्दीतील आंबेनळी घाटात भीषण अपघाताची घटना घडल्याची शक्यता व्यक्त होत आहे. घाटातील धोकादायक वळणावर एका बाईकचा अपघात होऊन ती बॅरिकेट्समध्ये अडकलेल्या अवस्थेत आढळून आली असून संबंधित बाईकवरील प्रवासी खोल दरीत कोसळल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच प्रतापगड रेस्क्यू टीम आणि महाबळेश्वर ट्रेकर्सचे सदस्य तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून अपघातग्रस्त व्यक्तीचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. मात्र, सध्या परिसरात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे आणि दाट धुक्यामुळे शोधकार्यामध्ये मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण होत आहेत.
आंबेनळी घाट हा अत्यंत धोकादायक वळणांचा घाट म्हणून ओळखला जातो. विशेषतः पावसाळी वातावरणात रस्ता घसरडा होत असल्याने अपघाताची शक्यता अधिक वाढते.
दरम्यान, शोधकार्य सुरू असून अपघातग्रस्त व्यक्तीचा शोध लागताच अधिकृत माहिती जाहीर केली जाणार असल्याचे बचाव पथकाकडून सांगण्यात आले आहे. स्थानिक प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने ही मोहीम सुरू असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.
Comments
Post a Comment