महाबळेश्वर पंचायत समितीची मासिक सभा संपन्न; पाणीटंचाई, विकासकामे व योजनांच्या अंमलबजावणीवर भर

महाबळेश्वर पंचायत समितीची मासिक सभा संपन्न; पाणीटंचाई, विकासकामे व योजनांच्या अंमलबजावणीवर भर

प्रतापगड प्रतिनिधी : 

पंचायत समिती महाबळेश्वरची मासिक सर्वसाधारण सभा आज कै. एम. आर. भिलारे सभागृहात सभापती सौ. शकुंतला रमेश चोरमले यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेला उपसभापती संजय मोरे, पंचायत समिती सदस्य संजय विठ्ठल शेलार, वंदना प्रवीण भिलारे, जिल्हा परिषद सदस्य संजय केळगणे, अजित संकपाळ, तसेच मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम, गट विकास अधिकारी विजय विभुते यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सभेच्या प्रारंभी मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. त्यानंतर विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने सादर केलेल्या अहवालात अनुदान, खर्च व शिल्लक निधीची माहिती देण्यात आली. जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या कामांची गावनिहाय माहिती देण्यात आली असून टंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

बांधकाम विभागाच्या आढाव्यात जनसुविधा, यात्रास्थळे व सेसअंतर्गत सुरू असलेल्या कामांची माहिती देण्यात आली. अपूर्ण कामे वेळेत पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांवर विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. शिक्षण विभागाने विविध योजनांची माहिती देत रिक्त पदे भरणे, शाळा दुरुस्ती व नवीन बांधकामे यावर भर देण्याचे सांगितले. तसेच विद्यार्थ्यांसाठी पुस्तक वाटप, उपस्थिती भत्ता व दिव्यांग लाभार्थी योजनांची माहितीही सादर करण्यात आली.

कृषी विभागाने बियाणे वाटप, खत पुरवठा व मिनीकीट योजनांबाबत माहिती दिली असून या योजना गावागावात प्रभावीपणे पोहोचविण्याच्या सूचना देण्यात आल्या. आरोग्य विभागाने विविध निर्देशांकांचा आढावा घेत सर्पदंश व श्वानदंश प्रतिबंधासाठी आवश्यक लसींचा साठा उपलब्ध असल्याचे सांगितले. पशुसंवर्धन विभागाने योजनांची माहिती देताना जनावरांसाठी खोडा व चारा टंचाईबाबत योग्य नियोजन करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम यांनी वित्तीय शिस्तीवर भर देत पंचायत समितीला प्राप्त झालेल्या एक कोटी पन्नास लाख रुपयांच्या निधीचा वेळेत व नियमानुसार वापर करण्याच्या सूचना दिल्या. तसेच व्हीपीडीई प्रणालीद्वारे खर्च वेळेत करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. होल्डिंग अकाऊंट, जीएसटी व आयकर विषयक कामकाज सुयोग्य पद्धतीने पार पाडण्याचे निर्देशही देण्यात आले.

कोयना पुनर्वसन विभागास प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्यास सांगण्यात आले. अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्ती विकास योजनांअंतर्गत दहा गावांतील कामांची सद्यस्थिती मांडण्यात आली असून निविदा प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली. घरकुल योजनांच्या कामांचाही आढावा घेण्यात आला.

सभेच्या शेवटी गट विकास अधिकारी विजय विभुते यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदाधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करून कामकाज वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन समन्वयाने काम करण्याचे आवाहन करण्यात आले. उपस्थित पदाधिकाऱ्यांनीही विकासकामे गतीने पूर्ण करण्यावर भर दिला. अखेरीस आभार प्रदर्शनानंतर सभेची सांगता करण्यात आली.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl