मुंबई पॉईंट परिसरात स्वच्छता मोहिम; नैसर्गिक पाणवठ्यांच्या जतनातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
मुंबई पॉईंट परिसरात स्वच्छता मोहिम; नैसर्गिक पाणवठ्यांच्या जतनातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
महाबळेश्वर प्रतिनिधी :
सेवाभावी कार्यात सदैव अग्रभागी असलेल्या महाबळेश्वर इनर व्हील क्लबच्या वतीने सह्याद्री ट्रेकर्सच्या सहकार्याने येथील प्रसिद्ध मुंबई पॉईंट परिसरात व्यापक स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत परिसरातील कचरा हटवून स्वच्छता करण्यात आलीच, शिवाय जंगलातील वन्यजीव व पशुपक्ष्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेल्या नैसर्गिक पाणवठे आणि झऱ्यांचीही स्वच्छता करून त्यांचे जतन करण्यावर भर देण्यात आला.
या उपक्रमातून पर्यावरण संवर्धन आणि निसर्ग संरक्षणाचा प्रभावी संदेश देण्यात आला. भविष्यातही अशाच प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविण्याचा निर्धार सहभागी सदस्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमादरम्यान सह्याद्री ट्रेकर्सचे प्रमुख संजय पार्टे यांनी महाबळेश्वर व परिसरातील ऐतिहासिक व जुन्या ट्रेकिंग मार्गांची माहिती देत सहभागी सदस्यांना प्रत्यक्ष ट्रेकिंगचे धडे दिले, ज्यामुळे या उपक्रमाला एक वेगळे शैक्षणिक आणि प्रेरणादायी स्वरूप प्राप्त झाले.
या स्वच्छता मोहिमेचे नेतृत्व इनर व्हील क्लबच्या अध्यक्षा वर्षा संतोष पार्टे आणि सह्याद्री ट्रेकर्सचे प्रमुख संजय पार्टे यांनी केले. या उपक्रमात मुक्ता कोमटी, अदिती भांगडिया, वंदना पल्लोड, मनीषा कोमटी, नेहा साळवी, शुभांगी खुरसाणे, वैशाली परदेशी, विजय केळगणें, कमलेश कदम, राजू साळवी, किरण जाधव, कमलेश साळुंखे, राजेंद्र धोत्रे, वृषाली दोईफोडे, स्वाती धोत्रे, अर्चना जाधव, ज्योती ढाणक, मेघा चोरगे यांच्यासह अनेक पर्यावरणप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग घेत परिश्रम घेतले.
या उपक्रमामुळे मुंबई पॉईंट परिसर अधिक स्वच्छ आणि निसर्गस्नेही बनला असून स्थानिकांसह पर्यटकांनाही पर्यावरण जपण्याची प्रेरणा मिळाली आहे.
Comments
Post a Comment