“सुशोभीकरण की धोक्याची वाट? मुख्य बाजारपेठेत प्लायवूडचा खेळ”

“सुशोभीकरण की धोक्याची वाट? मुख्य बाजारपेठेत प्लायवूडचा खेळ”

मिलिंद काळे,
महाबळेश्वर प्रतिनिधी  :

 पर्यटननगरी महाबळेश्वरच्या गजबजलेल्या मुख्य बाजारपेठेत सुरू असलेले सुशोभीकरणाचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडले असून, अर्धवट आणि निकृष्ट कामामुळे नागरिक व पर्यटकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नेताजी सुभाषचंद्र बोस चौक या मुख्य मार्गावर रस्त्याच्या कामाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात खड्डे करण्यात आले असून, त्यावर तात्पुरत्या स्वरूपात टाकण्यात आलेले प्लायवूड आता धोकादायक ठरत आहे.

ठेकेदाराकडून सुरुवातीला या खड्ड्यांवर मजबूत लोखंडी जाळी बसवण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात जाळी बसवण्याऐवजी लाकड प्लायवूड टाकून काम भागवले जात असल्याचे चित्र समोर आले आहे. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पोलीस स्टेशन दरम्यान अनेक ठिकाणी योग्य सुरक्षात्मक उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.

दरम्यान, या प्लायवूडवरून सतत चारचाकी वाहने वर्दळ करत असल्याने अनेक ठिकाणी ते तुटले असून, खाली असलेले खड्डे अधिकच उघडे पडले आहेत. त्यामुळे चालणाऱ्या नागरिकांना तसेच वाहनधारकांना अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे. पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर शहरात पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, वयोवृद्ध नागरिक आणि लहान मुलांचा वावरही अधिक आहे. अशा परिस्थितीत या धोकादायक रस्त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.

रात्रीच्या वेळी परिस्थिती आणखी बिकट बनते. अनेक ठिकाणी पथदिवे बंद असल्याने तसेच दुकानांची प्रकाशयोजना कमी झाल्याने अंधारात खड्डे दिसत नाहीत. परिणामी, अंधारात चालताना किंवा वाहन चालवताना अपघात होण्याची शक्यता अधिक वाढली आहे.

याचबरोबर, मुख्य बाजारपेठेतील काम पूर्ण होण्याआधीच मारिपेठ परिसरात गटार कामाला सुरुवात करण्यात आल्याने शहरभर अर्धवट कामांचे जाळे पसरले आहे. ठिकठिकाणी खड्डे, बांधकाम साहित्य आणि घाण यामुळे शहराच्या सौंदर्यावरही परिणाम झाला आहे. “जिकडे जावे तिकडे अर्धवट कामे आणि अव्यवस्था,” अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटत आहे.

सातारा जिल्ह्यात एकाचवेळी अनेक मंत्री असतानाही महाबळेश्वरसारख्या महत्त्वाच्या पर्यटनस्थळी अशी दुरवस्था का, असा सवाल उपस्थित होत आहे. स्थानिक आमदार आणि संबंधित मंत्री या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देतील का, याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.

दरम्यान, सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले तसेच पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी संबंधित काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती आहे. मात्र प्रत्यक्षात कामाचा वेग वाढलेला दिसत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

“जेवढं काम सुरू आहे ते तरी प्राधान्याने आणि सुरक्षिततेची काळजी घेत पूर्ण करा. किमान एक तरी प्रकल्प वेळेत पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्या,” अशी अपेक्षा महाबळेश्वरकर व्यक्त करत आहेत. प्रशासन आणि ठेकेदार यांच्याकडून तातडीने योग्य ती कार्यवाही होईल का, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl