कुंभरोशी येथे दुर्मिळ ‘मलेओ’ पक्ष्याचे प्राण वाचले; स्थानिकांच्या सतर्कतेमुळे जीवदान
प्रतापगड प्रतिनिधी :
महाबळेश्वर तालुक्यातील कुंभरोशी परिसरात एक अतिशय दुर्मिळ आणि वैशिष्ट्यपूर्ण ‘मलेओ’ पक्षी जखमी अवस्थेत आढळून आल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. इंडोनेशियातील सुलावेसी बेटावर आढळणारा हा पक्षी स्थानिक शेतात सापडल्याने ही घटना विशेष लक्षवेधी ठरली आहे.
कुंभरोशी येथील शेतकरी शरद सावंत यांना त्यांच्या शेतात हा पक्षी जखमी अवस्थेत दिसून आला. पक्ष्याची अवस्था पाहून त्यांनी तात्काळ वनविभागाशी संपर्क साधला. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पक्ष्याला ताब्यात घेतले आणि त्याच्यावर आवश्यक उपचार करण्यात आले. काही काळ उपचार आणि निगराणी केल्यानंतर पक्ष्याची प्रकृती सुधारल्याने त्याला सुरक्षितपणे पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
या संपूर्ण बचाव कार्यात मनीष पवार, रुद्र बेलिडकर, गौरव बडोले, श्रेयश गारसुंड आणि शरद सावंत यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या तत्परतेमुळे एका दुर्मिळ आणि संकटग्रस्त पक्ष्याचा जीव वाचवण्यात यश आले.
मलेओ हा पक्षी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण प्रजनन पद्धतीसाठी ओळखला जातो. तो अंडी उबवण्यासाठी वाळू किंवा ज्वालामुखीय उष्णतेचा वापर करतो, जे निसर्गातील एक अद्भुत उदाहरण मानले जाते. मात्र अंड्यांची चोरी, शिकारी आणि जंगलतोड यामुळे या पक्ष्यांची संख्या झपाट्याने कमी होत असून तो ‘अतिशय धोक्यात’ असलेल्या प्रजातींमध्ये गणला जातो.
कुंभरोशी येथे या पक्ष्याचा आढळ हा दुर्मिळ प्रकार असून वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीनेही ही घटना महत्त्वाची मानली जात आहे. स्थानिक नागरिकांनी दाखवलेल्या जागरूकतेमुळे आणि वनविभागाच्या त्वरित प्रतिसादामुळे एक अमूल्य जीव वाचल्याची भावना व्यक्त होत आहे.
Comments
Post a Comment