इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये अनधिकृत आरसीसी बांधकाम; मेटतळेतील प्रकरणामुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह
इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये अनधिकृत आरसीसी बांधकाम; मेटतळेतील प्रकरणामुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह
महाबळेश्वर प्रतिनिधी :
महाबळेश्वर तालुक्यातील मेटतळे येथे सर्वे नंबर १/१४ मध्ये सुरू असलेल्या अनधिकृत दुमजली आरसीसी बांधकामामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील म्हणून घोषित करण्यात आलेल्या इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये अशा प्रकारचे बांधकाम सुरू असल्याची माहिती समोर आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
माहितीनुसार, संबंधित परिसर हा निसर्गसंपन्न आणि पर्यावरणीयदृष्ट्या महत्त्वाचा भाग असून येथे कोणत्याही प्रकारचे मोठे बांधकाम करण्यासाठी कठोर नियम व अटी लागू आहेत. अशा ठिकाणी आरसीसी स्वरूपाचे दुमजली बांधकाम उभारण्यासाठी वनविभाग, पर्यावरण विभाग तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असते. मात्र, या बांधकामासाठी अशा परवानग्या घेण्यात आल्या आहेत का, याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती उपलब्ध नसल्याने संशय अधिक गडद होत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणी तलाठी व ग्रामसेवक यांचे स्पष्ट दुर्लक्ष होत असून प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रशासनाची निष्क्रियता आणि जबाबदारी टाळण्याची भूमिका उघड होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे, इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी शासनाने स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे आखून दिलेली असतानाही प्रत्यक्षात त्यांची अंमलबजावणी होत नसल्याचे या घटनेतून स्पष्ट होत आहे. यामुळे भविष्यात अशा प्रकारच्या बेकायदेशीर बांधकामांना अधिकच प्रोत्साहन मिळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत जिल्हा प्रशासन, वनविभाग आणि पर्यावरण विभागाने तात्काळ संयुक्त पाहणी करून वस्तुस्थिती तपासावी, तसेच नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरत आहे. प्रशासनाने वेळेत कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशाराही काही नागरिकांनी दिला आहे.
Comments
Post a Comment