“यात्रेत भाविकांची गर्दी, पण गॅसचा तुटवडा; पार्वतीपुर परिसरात नागरिक हैराण”

“यात्रेत भाविकांची गर्दी, पण गॅसचा तुटवडा; पार्वतीपुर परिसरात नागरिक हैराण”

प्रतापगड प्रतिनिधी :

महाबळेश्वर तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पार्वतीपुर येथे सुरू असलेल्या श्री रामवरदायिनी माता यात्रेमुळे गावात सध्या उत्साहाचे वातावरण असले, तरी घरगुती गॅस पुरवठ्याच्या गंभीर समस्येमुळे ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. दिनांक १४ पासून यात्रेला प्रारंभ झाल्यानंतर परगावी असलेले ग्रामस्थ तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने गावात दाखल झाले असून, त्यामुळे दैनंदिन गरजांवर ताण वाढला आहे.

या पार्श्वभूमीवर घरगुती वापरासाठी लागणाऱ्या गॅसचा पुरवठा मात्र पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे चित्र दिसत आहे. महाबळेश्वर तालुक्याच्या पश्चिम भागात प्रामुख्याने एचपी गॅसचा पुरवठा होत असून, संबंधित वितरक एन. एस. कोमटी यांच्याकडून सेवा दिली जाते. मात्र अनेक नागरिकांनी गॅस बुकिंग केल्यानंतर ओटीपी व बुकिंग क्रमांक मिळूनही प्रत्यक्ष सिलिंडर मिळत नसल्याची तक्रार केली आहे.

गॅस एजन्सीच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता फोन लागत नसल्याचे नागरिक सांगतात. तसेच एचपी कंपनीच्या इतर हेल्पलाईन क्रमांकांवरही संपर्क होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, सुमारे ९०० रुपयांचा गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी काहींना दोन ते अडीच हजार रुपये खर्च करून महाबळेश्वर शहरात जावे लागत आहे.

यात्रेच्या काळात हजारो भाविक गावात उपस्थित असताना अशा प्रकारचा गॅस तुटवडा निर्माण झाल्याने स्थानिक प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या समस्येबाबत स्थानिक पोलीस पाटील यांनी तहसीलदारांशी संपर्क साधून तातडीने गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. मात्र अद्याप प्रशासनाने या प्रश्नाकडे अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

दरम्यान, यात्रेचा कालावधी सुरू असताना तातडीने गॅस पुरवठा सुरळीत करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी जोर धरत असून, प्रशासनाने याकडे त्वरीत लक्ष देणे आवश्यक असल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl