“जिल्हा परिषदेत अभूतपूर्व आंदोलन; सभापती निवडीवर बहिष्कार, काळ्या फितींनी निषेध”
“जिल्हा परिषदेत अभूतपूर्व आंदोलन; सभापती निवडीवर बहिष्कार, काळ्या फितींनी निषेध”
सातारा प्रतिनिधी :
सातारा जिल्हा परिषदेत २० तारखेला पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेवरून राजकीय वातावरण तापले असून, या निवडणुकीविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी सभापती निवडीच्या प्रक्रियेवर बहिष्कार टाकला. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर गंभीर आरोप करत सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप केला.
देसाई यांनी सांगितले की, २० तारखेला झालेली निवडणूक ही लोकशाही मूल्यांना तिलांजली देणारी असून, भाजपने बळाचा वापर करून हुकूमशाही पद्धतीने ही प्रक्रिया राबवली. त्यामुळे विरोधी पक्षातील सदस्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. याच निषेधार्थ आजच्या सभापती निवड प्रक्रियेला बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आज झालेल्या जिल्हा परिषद बैठकीत या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटले. सर्व विरोधी सदस्यांनी काळ्या फिती लावून बैठकीला उपस्थिती दर्शवली आणि निषेध नोंदवला. विशेष म्हणजे, सातारा जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच जिल्हा परिषद सदस्यांनी पायऱ्यांवर बसून आंदोलन केल्याचे चित्र पाहायला मिळाले, ज्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधोरेखित झाले.
दरम्यान, बहिष्कार असूनही सदस्यांनी जनतेच्या कामांबाबत आपली बांधिलकी कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. कामकाजात आवश्यक तेथे सहभागी होत जनतेच्या प्रश्नांसाठी लढा सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. अन्यायाविरोधात ठाम भूमिका घेऊन सर्व सदस्यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.
२० तारखेला घडलेल्या प्रकारामुळे आमच्या भावना अत्यंत तीव्र असून, न्याय मिळेपर्यंत हा निषेध कायम राहील, असा इशारा देत शंभूराज देसाई यांनी पुढील आंदोलनाची शक्यता देखील व्यक्त केली. जिल्हा परिषदेत सुरू झालेल्या या राजकीय संघर्षाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
Comments
Post a Comment