“जय भीमच्या जयघोषात दुमदुमले महाबळेश्वर; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी”
“जय भीमच्या जयघोषात दुमदुमले महाबळेश्वर; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी”
मिलिंद काळे,
महाबळेश्वर प्रतिनिधी :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त महाबळेश्वर शहरात उत्साह, जल्लोष आणि सामाजिक एकात्मतेचा भव्य सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. “जय भीम”च्या घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले होते. युवक, युवती, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि बालकांपासून सर्वच स्तरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत जयंती उत्सव अविस्मरणीय ठरवला.
१३ एप्रिलच्या मध्यरात्री बरोबर १२ वाजता बाबासाहेबांच्या अर्धकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जयंती उत्सवाची विधिवत सुरुवात करण्यात आली. दीपप्रज्वलन, घोषणाबाजी आणि सामूहिक अभिवादनाने वातावरण भारावून गेले. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचा अभिमान उपस्थितांनी व्यक्त केला.
सकाळी पेटीत लायब्ररी परिसरात दिवसभर भीमगीतांचा कार्यक्रम रंगला. तालुक्यातील विविध भीमगीत गायन पथकांनी आपल्या सादरीकरणातून बाबासाहेबांच्या विचारांचा जागर केला. “समता, स्वातंत्र्य आणि बंधुता” या मूल्यांवर आधारित गीतांनी उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. युवकांसह महिलांनीही या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला.
सायंकाळी ७ वाजता नवबौद्ध तरुण मंडळाच्या नूतन कार्यालय परिसरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. निळ्या झेंड्यांनी सजलेली ही मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गांवरून जल्लोषात पुढे सरकत राहिली. डीजेच्या तालावर युवक-युवती, महिला व पुरुषांनी उत्स्फूर्त नृत्य करत सहभाग घेतला. ठिकठिकाणी फुलांची उधळण करून मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले.
या मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरला तो म्हणजे बाबासाहेबांच्या अर्धकृती पुतळ्याचा भव्य रथ. विविध रंगांच्या फुलांनी सजविलेला आणि आकर्षक विद्युत रोषणाईने उजळलेला हा रथ नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेत होता. चमचमणाऱ्या दिव्यांच्या प्रकाशात बाबासाहेबांचा पुतळा अत्यंत दिमाखदार दिसत होता. अनेकांनी या रथासोबत छायाचित्रे टिपण्यासाठी गर्दी केली.
ही मिरवणूक स्कुल मोहल्ला, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे पुढे डॉ. साबणे रोड वरून मार्गक्रमण करत अखेर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे पोहोचली. येथे सर्व भीम अनुयायांनी एकत्र येत घोषणांच्या गजरात बाबासाहेबांना अभिवादन केले आणि मिरवणुकीची दिमाखदार सांगता झाली.
या संपूर्ण सोहळ्याचे नियोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, नवबौद्ध तरुण मंडळ आणि तालुक्यातील भीम अनुयायांनी उत्कृष्टरीत्या केले होते. वाहतूक नियंत्रण, स्वच्छता, सुरक्षा आणि कार्यक्रम व्यवस्थापन यामुळे कार्यक्रम सुरळीत पार पडला.
दरम्यान, नगराध्यक्ष सुनील शिंदे व संतोष आबा शिंदे यांनी कार्यक्रमाला भेट देत नागरिकांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. सामाजिक कार्यकर्ते अल्ताफ मानकर, किरण शिंदे यांचीही उपस्थिती लाभली. माजी नगराध्यक्षा स्वप्नाली ताई शिंदे तसेच नगरसेवक कुमार गोरखनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा यशस्वीपणे पार पडला.
शहरातील राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेषतः युवकांचा उत्साह, महिलांचा सहभाग आणि सर्व समाजघटकांचा एकत्रित सहभाग हे या उत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य ठरले.
महाबळेश्वरमध्ये साजरी झालेली ही आंबेडकर जयंती केवळ एक उत्सव न राहता, सामाजिक समता, बंधुभाव आणि संविधान मूल्यांचा जागर करणारी ठरली. बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार करत समाजाला एकत्र आणणारा हा भव्य सोहळा नागरिकांच्या स्मरणात दीर्घकाळ राहणार आहे.
Comments
Post a Comment