“जावली–महाबळेश्वर जोडणीला नवे बळ; रस्त्यांच्या जाळ्यामुळे ग्रामीण विकासाला वेग”
“जावली–महाबळेश्वर जोडणीला नवे बळ; रस्त्यांच्या जाळ्यामुळे ग्रामीण विकासाला वेग”
प्रतापगड प्रतिनिधी :
जावली आणि महाबळेश्वर तालुक्यांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या कामांना सध्या अभूतपूर्व वेग आला असून, या विकासकामांमुळे दुर्गम भागातील गावांचे चित्र झपाट्याने बदलत आहे. पूर्वी तापोळा, बामणोली किंवा कास परिसरात जाण्यासाठी मेढ्यातून साताराला मोठा वळसा घालावा लागत होता. मात्र गेल्या १० ते १५ वर्षांत काही महत्त्वाचे रस्ते पूर्ण झाल्याने दळणवळणाची सोय मोठ्या प्रमाणात सुधारली असून, आता नव्याने होणाऱ्या रस्त्यांमुळे हा बदल अधिक गतीमान होण्याची चिन्हे दिसत आहेत.
सध्या सातारा–कास–महाबळेश्वर राजमार्गावर पोहोचण्यासाठी जावलीत मालचोंडी, कुसुंबी आणि वागदरे या तीन प्रमुख मार्गांची सोय उपलब्ध झाली आहे. या रस्त्यांमुळे डोंगराळ भागातील गावांचा संपर्क मुख्य रस्त्यांशी सुलभ झाला आहे. याशिवाय म्हाते खुर्द येथून नवीन रस्ता करण्यासाठी सर्व्हे सुरू असून, केळघर ते कुरूळशी दरम्यानचा रस्ता अंशतः डांबरीकरण झालेला आहे. पुढील टप्प्यात या रस्त्याचे पूर्णपणे मजबुतीकरण होणार असल्याने वाहतुकीला मोठी चालना मिळणार आहे. तसेच केळघर–डांगरेघर–भिलार–पाचगणी हा मार्ग विकसित होत असून, भविष्यात हा मार्ग पर्यटन आणि स्थानिक प्रवासासाठी महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.
या नव्या रस्त्यांमुळे अंतरात मोठी घट झाली आहे. पूर्वी मेढ्यातून बामणोलीला जाण्यासाठी ६२ किलोमीटरचा प्रवास करावा लागत होता, मात्र कुसुंबी–सह्याद्रीनगर मार्गे हे अंतर आता २७ किलोमीटरवर आले आहे. घाटाई देवी परिसरासह डोंगराळ भागातील अनेक गावांचे अंतर निम्म्यावर आले असून, आरोग्य, शिक्षण आणि इतर मूलभूत सुविधा आता अधिक सहजपणे पोहोचत आहेत.
तसेच ऐकीव धबधब्यासारख्या पर्यटनस्थळांपर्यंत पोहोचणेही आता सोपे झाले आहे. पूर्वी मेढा–सातारा मार्गे सुमारे ४९ किलोमीटरचा प्रवास करावा लागत होता, मात्र मालचोंडी मार्ग विकसित झाल्यामुळे हे अंतर आता केवळ १७ किलोमीटरवर आले आहे. यामुळे स्थानिक पर्यटनालाही मोठी चालना मिळत आहे.
वेण्णा नदीवरील रिटकवली ते काळोशी दरम्यान प्रस्तावित पुलासाठी सध्या ट्रायल पिटचे काम सुरू असून, खडकांची तपासणी केली जात आहे. हा पूल पूर्ण झाल्यास मेढा ते ऐकीव मार्ग सुमारे १२ किलोमीटरपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. तसेच काळोशी, तांबी आणि आसपासच्या गावांतील नागरिकांना मेढ्यात येण्यासाठीचे अंतर निम्म्यावर येणार आहे. लिंब, सायगाव आणि मेरुलिंग भागातील नागरिकांनाही कास व ऐकीवला जाण्यासाठी शॉर्टकट मार्ग उपलब्ध होणार असून, मेरुलिंग रस्त्याचे सिमेंटीकरणही प्रस्तावित असल्याची माहिती आहे.
तापोळा परिसरासाठीही हे रस्ते महत्त्वाचे ठरत आहेत. सध्या महाबळेश्वरवरून तापोळ्याला जाण्यासाठी ५५ किलोमीटर अंतर पार करावे लागते, तर मेढा–बामणोली मार्गे हे अंतर अधिक वाढते. मात्र म्हाते खुर्द मार्गे नवीन रस्ता तयार होऊन पुढे निपाणी किंवा मांटी मार्गे आपटीला जोडला गेला आणि प्रस्तावित आपटी–तापोळा पूल पूर्ण झाला, तर मेढा ते तापोळा हे अंतर सुमारे २५ किलोमीटरपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे म्हाते परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
याशिवाय मेढा–वागदरे मार्गे राजमार्गावर येऊन कुरोशी व लाखवडमार्गे तापोळ्याला जाण्यासाठी सध्या ३४ किलोमीटर अंतर लागते. केळघर–कुरूळशी रस्ता पूर्णपणे डांबरीकरण झाल्यास हे अंतर २२ किलोमीटरपर्यंत कमी होऊ शकते. तसेच केळघर येथून पाचगणीला जाण्यासाठी सध्या ३३ किलोमीटर अंतर पार करावे लागते, मात्र डांगरेघर ते भिलार रस्ता पक्का झाल्यास हे अंतर सुमारे २० किलोमीटरवर येणार आहे.
एकूणच, जावली आणि महाबळेश्वर तालुक्यांना जोडणाऱ्या या रस्त्यांच्या जाळ्यामुळे ग्रामीण भागात विकासाचे नवे पर्व सुरू झाले आहे. दळणवळण सुलभ झाल्यामुळे व्यापार, पर्यटन आणि रोजगाराच्या संधी वाढत असून, सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या विकासकामांमुळे प्रगतीचा वेग आणखी वाढेल, अशी आशा नागरिक व्यक्त करत आहेत.
Comments
Post a Comment