“धरणातील गाळ शेतात, उत्पादनात कमाल!” – ‘गाळमुक्त धरण, समृद्ध शिवार’ योजनेचा राज्यभर विस्तार”
प्रतापगड प्रतिनिधी —
राज्यातील शेतकऱ्यांना अधिक उत्पादनक्षम बनवण्यासाठी आणि जलसाठ्यांची क्षमता वाढवण्यासाठी राबविण्यात येणारी “गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” ही योजना अधिक व्यापक करण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. सातारा जिल्ह्यातील दरे (ता. महाबळेश्वर) येथे कोयना धरणातील गाळ काढण्याच्या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी कार्यालय आणि नाम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत असून, धरणातील साचलेला गाळ काढून तो शेतजमिनीमध्ये वापरण्याचा उद्देश आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा क्षमता वाढण्यास मदत होते, तसेच शेतजमिनीची सुपीकता वाढून उत्पादनात लक्षणीय वाढ होते.
यावेळी सातारा जिल्हा परिषद सदस्य अजित संकपाळ, महाबळेश्वर पंचायत समितीचे उपसभापती संजय मोरे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, उपवन संरक्षक अमोल सातपुते, वाईचे प्रांताधिकारी डॉ. योगेश खरमाटे, साताऱ्याचे प्रांताधिकारी आशिष बारकुल यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. उपस्थित अधिकाऱ्यांनी या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करत स्थानिक पातळीवर अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, उन्हाळ्यात धरणांची पाणी पातळी घटते, त्यावेळी गाळ काढण्याची ही योग्य संधी असते. गाळ काढल्याने धरणांची साठवण क्षमता वाढते आणि तोच गाळ शेतीसाठी खतासारखा उपयुक्त ठरतो. त्यामुळे जलसंधारण आणि शेती विकास या दोन्ही दृष्टीने ही योजना अत्यंत प्रभावी ठरत आहे.
तसेच, जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी धरणे व तलावांमधील गाळ काढून तो आपल्या शेतात टाकावा, त्यामुळे जमीन अधिक सुपीक होऊन कृषी उत्पादन वाढेल, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या उपक्रमामुळे जलसाठा वाढीसह शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीतही सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
---------------------------------------------
योजनेचे फायदे गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेमुळे धरणांची पाणीसाठा क्षमता वाढते, तसेच काढलेला गाळ शेतात टाकल्याने जमिनीची सुपीकता सुधारते. यामुळे पिकांचे उत्पादन वाढून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडते. जलसंधारण आणि शेती विकासाचा दुहेरी लाभ या योजनेतून मिळतो.
---------------------------------------------
शेतकऱ्यांना आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवाहन करताना सांगितले की, उन्हाळ्यातील कमी पाणी पातळीचा फायदा घेत धरणे व तलावांमधील गाळ काढावा आणि तो शेतात वापरावा. यामुळे जमिनीची गुणवत्ता सुधारून भविष्यातील उत्पादनात लक्षणीय वाढ होऊ शकते.
Comments
Post a Comment