घनदाट सह्याद्रीत श्रीरामवरदायिनी मातेसाठी भक्तांचा महासागर उसळणार; पारसोंड येथे भव्य यात्रोत्सवाची जय्यत तयारी


घनदाट सह्याद्रीत श्रीरामवरदायिनी मातेसाठी भक्तांचा महासागर उसळणार; पारसोंड येथे भव्य यात्रोत्सवाची जय्यत तयारी

प्रतापगड प्रतिनिधी :

महाबळेश्वर परिसरातील सह्याद्रीच्या निसर्गरम्य कुशीत वसलेल्या पारसोंड येथील प्राचीन श्रीरामवरदायिनी मातेसाठी यंदाचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार असून भाविकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. समर्थ रामदास स्वामींनी ज्या तुळजाभवानी मातेला “रामवरदायिनी” असे संबोधले, त्याच दैवताचे हे पवित्र स्थान मानले जाते. महाबळेश्वरच्या पश्चिमेस सुमारे २० किलोमीटर आणि प्रतापगड किल्ल्याच्या दक्षिणेस अवघ्या ३ किलोमीटर अंतरावर घनदाट जंगलांनी वेढलेल्या या मंदिराला ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या मोठे महत्त्व लाभले आहे.


चैत्र कृ. १२, शके १९४८ मंगळवार दिनांक १४ एप्रिल २०२६ पासून ते वैशाख शु. ६ बुधवार दिनांक २२ एप्रिल २०२६ पर्यंत हा यात्रोत्सव पार पडणार असून या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. यात्रेतील प्रमुख आकर्षण म्हणून चैत्र अमावास्येच्या मध्यरात्री होणारा बगाड सोहळा विशेष मानला जातो, तर वैशाख शुद्ध पंचमीला होमहवन, लघुरुद्र अभिषेक, छबिना आणि महाप्रसाद या विधींना विशेष महत्त्व आहे.

यात्रोत्सवाच्या प्रारंभी सकाळी अभिषेकाने सुरुवात होऊन सायंकाळी सत्यनारायण महापूजा व गावातून पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील काही दिवस विविध गावांतील देवदेवतांचे आगमन, महापूजा, आरती, ढोल-लेझीम सादरीकरण तसेच पारंपरिक लोकनाट्य तमाशा कार्यक्रमांमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारून जाणार आहे. विशेष म्हणजे ४३ गावांतील देवांचे विडे वर्तविण्याचा पारंपरिक सोहळा हा यात्रेचा मुख्य आकर्षण ठरणार आहे.

यात्रेच्या उत्तरार्धात होमहवन, शालेय सांस्कृतिक कार्यक्रम, बक्षीस वितरण समारंभ आणि मान्यवरांचा सत्कार यांचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेच्या अखेरच्या दिवशी पहाटे छबिना व पालखी मिरवणूक, त्यानंतर लघुरुद्र अभिषेक व होमसमाप्ती होऊन महाप्रसादाने उत्सवाची सांगता होणार आहे.

या भव्य उत्सवासाठी श्रीरामवरदायिनी देवस्थान ट्रस्ट, पारसोंड तसेच ग्रामस्थ मंडळींनी सर्व भाविकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.


■ बगाड सोहळ्याचे महत्त्व ■

चैत्र अमावास्येच्या मध्यरात्री साजरा होणारा बगाड सोहळा हा यात्रेतील सर्वात पारंपरिक व भावनिक क्षण मानला जातो. श्रद्धा, नवस आणि भक्ती यांचे प्रतीक असलेला हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक उपस्थित राहतात. बगाडाच्या माध्यमातून भक्त आपली मनोकामना पूर्ण झाल्याची कृतज्ञता व्यक्त करतात. धार्मिक परंपरेनुसार हा सोहळा अत्यंत शिस्तबद्ध व विधीपूर्वक पार पाडला जातो, ज्यामुळे यात्रेचे वैशिष्ट्य अधिकच अधोरेखित होते.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl