“सातारा जिल्हा परिषदेत चार समित्यांना नवे नेतृत्व; बिनविरोध निवडीत राजकीय समीकरणे स्पष्ट
“सातारा जिल्हा परिषदेत चार समित्यांना नवे नेतृत्व; बिनविरोध निवडीत राजकीय समीकरणे स्पष्ट”
सातारा प्रतिनिधी :
सातारा जिल्हा परिषदेतील महिला व बाल कल्याण, समाज कल्याण तसेच इतर विषय समित्यांच्या सभापती पदांसाठी आयोजित दुसरी विशेष सभा आज पार पडली असून, सर्व पदांवर बिनविरोध निवड झाल्याने जिल्हा परिषदेत नव्या नेतृत्वाची औपचारिक घोषणा करण्यात आली. या निवडीमुळे जिल्हा परिषदेतील सत्ताधारी गटाची अंतर्गत एकजूट आणि राजकीय समन्वय स्पष्टपणे दिसून आला आहे.
या विशेष सभेत चारही पदांसाठी एकूण चार नामनिर्देशनपत्रे दाखल झाली होती. छाननी प्रक्रियेनंतर कोणत्याही अर्जावर हरकत किंवा आक्षेप न आल्याने सर्व नामनिर्देशनपत्रे वैध ठरवण्यात आली. परिणामी, प्रत्येक पदासाठी एकच उमेदवार असल्याने चारही उमेदवारांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली, अशी माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली.
महिला व बाल कल्याण समितीच्या सभापदी ऋतुजा विराज शिंदे यांची निवड करण्यात आली असून, समाज कल्याण समितीच्या सभापदी ऋषीकेश धायगुडे-पाटील यांची निवड झाली आहे. तसेच विषय समित्यांच्या सभापदी पदांसाठी लता अविनाश कर्णे आणि तेजस्विनी विक्रमशिल कदम यांची निवड निश्चित करण्यात आली आहे.
या निवड प्रक्रियेत कोणतीही निवडणूक न लागता सर्व पदे बिनविरोध भरली गेल्याने जिल्हा परिषदेतील सत्ताधारी गटाची रणनीती यशस्वी ठरल्याचे मानले जात आहे. आगामी काळात या नव्या पदाधिकाऱ्यांकडून महिला सक्षमीकरण, समाजकल्याणाच्या योजना आणि स्थानिक विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
सभेच्या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण, तहसीलदार समीर यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, जिल्हा परिषदेत झालेल्या या बिनविरोध निवडीमुळे राजकीय स्थैर्याचे चित्र दिसत असले, तरी प्रत्यक्षात नव्या पदाधिकाऱ्यांसमोर विविध विकासकामे, योजना अंमलबजावणी आणि नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे मोठे आव्हान उभे राहणार आहे.
Comments
Post a Comment