महाबळेश्वरात भक्तिभावाचा जल्लोष; श्री हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा
महाबळेश्वरात भक्तिभावाचा जल्लोष; श्री हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा
✍️प्रेषित गांधी,
महाबळेश्वर प्रतिनिधी :
महाबळेश्वर तालुक्यात श्री हनुमान जन्मोत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. मुख्य बाजारपेठेतील शंभर वर्षांहून अधिक जुने श्री हनुमान मंदिर तसेच वेण्णा लेक परिसरातील मंदिरांमध्ये दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक नागरिकांसह पर्यटकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला.
मुख्य बाजारपेठेतील श्री हनुमान मंदिरात श्री हनुमान मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट व गोल्डन मित्र मंडळाच्या वतीने आकर्षक धार्मिक सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले होते. मंदिराची फुलांनी केलेली विलोभनीय सजावट आणि आकर्षक विद्युत रोषणाईमुळे संपूर्ण परिसर उजळून निघाला होता. श्री हनुमानास परिधान केलेला चांदीचा देखणा पेहराव भाविकांचे विशेष आकर्षण ठरला.
पहाटे ६.१० वाजता श्रींच्या मूर्तीचा अभिषेक, आरती व पाळणा सोहळा पार पडला. त्यानंतर शहरातील महिलांनी एकत्र येत हनुमान चालीसा, रामरक्षा व हनुमान स्तोत्राचे सामूहिक पठण केले. दिवसभर मंदिरात भक्तांची सतत गर्दी होती. प्रसिद्ध बुधाजी भजनी मंडळाने सादर केलेल्या सुश्राव्य भजनांनी वातावरण भक्तिमय झाले. सायंकाळी माउली भजनी मंडळाच्या भजन कार्यक्रमाने उत्सवाची रंगत आणखी वाढवली. रात्री आठ वाजता महाआरती मोठ्या उत्साहात पार पडली, यावेळी मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला होता.
मंदिरासमोर आयोजित महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने पार पडल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले.
या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी हनुमान मंदिर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर कुंभारदरे यांच्यासह प्रभाकर देवकर, राजेश कुंभारदरे, नंदुशेट रानडे, संजयकाका दीक्षित, महेश गुजर, उमेश भिसे, विनोद गुजर, सचिन कुंभारदरे, अभिजीत तांबे, ओंकार दीक्षित, शुभम कुंभारदरे, स्वरूप देवकर, प्रितेश भिसे, जितेश कुंभारदरे, संतोष यादव, मंदार तांबे, गोविंद वाघ, मोनाली शिर्के-वाघ, चेतन मोरे, निलेश कारंडे, ऋतुराज कुंभारदरे, अमोल साळुंखे, पार्थ गुजर आदींनी विशेष परिश्रम घेतले.
दरम्यान, वेण्णा लेक परिसरातील श्री हनुमान मंदिर तसेच ज्येष्ठ पत्रकार संजय दस्तुरे यांच्या निवासस्थानी असलेल्या प्राचीन श्री हनुमान मंदिरातही हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. संपूर्ण महाबळेश्वर तालुक्यात या उत्सवानिमित्त भक्तिभाव, एकोप्याचे आणि धार्मिक उत्साहाचे वातावरण अनुभवायला मिळाले.
Comments
Post a Comment