दुर्गम सोळशी विभागाला जीवनदायी दिलासा; अजित संकपाळ यांच्या पुढाकारातून रुग्णवाहिकेचे लोकार्पण
दुर्गम सोळशी विभागाला जीवनदायी दिलासा; अजित संकपाळ यांच्या पुढाकारातून रुग्णवाहिकेचे लोकार्पण
प्रतापगड प्रतिनिधी :
दुर्गम आणि डोंगराळ भौगोलिक परिस्थितीमुळे अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित राहिलेल्या सोळशी विभागातील नागरिकांसाठी अत्यंत दिलासादायक ठरणारी रुग्णवाहिका (ॲम्ब्युलन्स) रामेघर येथे लोकार्पण करण्यात आली. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत आणि जीवितहानी टाळता यावी, या उद्देशाने हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. जिल्हा परिषद नवनिर्वाचित सदस्य अजित संकपाळ यांच्या पुढाकारातून आणि शिवसेना वैद्यकीय कक्षाच्या सहकार्याने ही रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून राज्यात विकासकामांना वेग मिळत असताना ग्रामीण व दुर्गम भागातील आरोग्य सेवांनाही प्राधान्य दिले जात असल्याचे या उपक्रमातून स्पष्ट झाले आहे. सोळशी विभागातील अनेक गावे डोंगरकपारीत वसलेली असल्याने रुग्णांना दवाखान्यापर्यंत पोहोचवणे हे मोठे आव्हान ठरत होते. विशेषतः अपघात, प्रसूती किंवा गंभीर आजाराच्या प्रसंगी वेळेत वाहन उपलब्ध न झाल्याने अडचणी निर्माण होत होत्या. या पार्श्वभूमीवर उपलब्ध झालेली रुग्णवाहिका ही स्थानिकांसाठी ‘जीवनदायी’ ठरणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
रामेघर येथे आयोजित श्री हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने हा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. धार्मिक वातावरणात आणि मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला राजेंद्र राजपुरे, गणेश उतेकर, संजय संकपाळ गुरुजी, सागर शेठ कदम, आनंद धनावडे, सुनील कदम (सरपंच), बाळकृष्ण कदम गुरुजी, शंकरदादा कदम, सुरेश कदम यांच्यासह अनेक मान्यवर व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हनुमान जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त रामेघर येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रवचन, हरिपाठ, कीर्तन आणि दिंडी यांसारख्या धार्मिक कार्यक्रमांनी वातावरण भक्तिमय झाले होते. गावातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. तसेच या सोहळ्यादरम्यान समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करून त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
या दुहेरी कार्यक्रमाचे—हनुमान जन्मोत्सव आणि रुग्णवाहिका लोकार्पण—रामेघर ग्रामस्थांनी अत्यंत नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध पद्धतीने आयोजन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल उपस्थित मान्यवरांनी ग्रामस्थांचे कौतुक केले.
दरम्यान, रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचा निर्णय हा स्थानिकांच्या दैनंदिन गरजांवर आधारित असल्याने अजित संकपाळ यांच्या कार्यपद्धतीचे विशेष कौतुक होत आहे. भविष्यातही अशाच प्रकारे विकासकामे आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
Comments
Post a Comment