महाबळेश्वर बस स्थानकासमोर भला मोठा खड्डा; अपघाताची भीती, प्रशासनाचे दुर्लक्ष उघड
महाबळेश्वर बस स्थानकासमोर भला मोठा खड्डा; अपघाताची भीती, प्रशासनाचे दुर्लक्ष उघड
महाबळेश्वर प्रतिनिधी :
जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वर शहरातील मुख्य बस स्थानकासमोरच भला मोठा खड्डा निर्माण झाल्याने नागरिक, पर्यटक आणि वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बस स्थानकातून बस बाहेर पडताना तसेच स्थानकात प्रवेश करतानाही याच मार्गाचा वापर करावा लागत असल्याने प्रत्येक वेळी बसला या खड्ड्यातूनच जावे लागत आहे. परिणामी प्रवाशांना मोठ्या धक्क्यांचा सामना करावा लागत असून कधीही मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या मार्गावरून केवळ एस.टी. बसेसच नव्हे, तर खासगी वाहने, दुचाकी आणि पर्यटकांची वाहनेही मोठ्या प्रमाणावर ये-जा करत असतात. त्यामुळे या खड्ड्यामुळे सर्वच वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अपघाताचा धोका अधिक वाढतो.
महाबळेश्वर–पाचगणी मार्गाची दुरवस्था आधीच सर्वश्रुत असताना, बस स्थानकासमोरील या गंभीर समस्येकडेही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. स्थानिक नागरिकांकडून वारंवार तक्रारी करूनही या खड्ड्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. परिणामी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
महाबळेश्वर हे राज्यासह देश-विदेशातील पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असताना, शहरातील मुख्य ठिकाणीच अशी दयनीय परिस्थिती निर्माण झाल्याने पर्यटन प्रतिमेलाही तडा जात आहे. पर्यटकांना उत्कृष्ट अनुभव देण्याऐवजी खड्ड्यांच्या धक्क्यांचा त्रास सहन करावा लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, संभाव्य अपघात टाळण्यासाठी संबंधित प्रशासनाने तातडीने या खड्ड्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक, व्यावसायिक आणि पर्यटकांकडून जोर धरू लागली आहे. वेळेत उपाययोजना न केल्यास एखादा मोठा अनर्थ घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Comments
Post a Comment