पॅंगोलिन तस्करीचा पर्दाफाश; वनविभागाची धडक कारवाई, 5.980 किलो खवले जप्त
पॅंगोलिन तस्करीचा पर्दाफाश; वनविभागाची धडक कारवाई, 5.980 किलो खवले जप्त
प्रतापगड प्रतिनिधी :
दुर्मिळ आणि अत्यंत संरक्षित वन्यप्राणी असलेल्या खवले मांजर (पॅंगोलिन) यांच्या तस्करीविरोधात वनविभागाने केलेल्या धडक कारवाईत एक आरोपी मुद्देमालासह जेरबंद करण्यात आला असून या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. वन्यजीव संरक्षणासाठी प्रशासन किती सतर्क आहे, याचे हे ठळक उदाहरण ठरले आहे.
दिनांक 18 एप्रिल 2026 रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे यांनी आपल्या पथकासह महाबळेश्वर बसस्थानक परिसरात सापळा रचला होता. चिपळूण येथून बसने महाबळेश्वर येथे खवले विक्रीच्या उद्देशाने आलेल्या प्रसाद तुकाराम गोसावी (रा. मानपाडा, डोंबिवली) याला संशयावरून ताब्यात घेण्यात आले. तपासादरम्यान त्याच्याकडून तब्बल 5.980 किलो वजनाचे खवले जप्त करण्यात आले असून हा प्रकार अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे.
या प्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खवले मांजराचा समावेश अनुसूची-I मध्ये असल्याने त्याची शिकार व तस्करी हा गंभीर दंडनीय गुन्हा मानला जातो. संबंधित कायद्यानुसार आरोपीस 3 ते 7 वर्षांपर्यंत कारावास तसेच 25 हजार रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. विशेष म्हणजे आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.
ही कारवाई उपवनसंरक्षक अमोल सातपुते (भा.व.से.), सहाय्यक वनसंरक्षक प्रदीप रौंधळ, दिगंबर जाधव तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे, वनरक्षक बा.भ. मराडे, तुकाराम निकम आणि इतर कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग होता.
दरम्यान, 19 एप्रिल 2026 रोजी आरोपीस महाबळेश्वर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला 23 एप्रिलपर्यंत चार दिवसांची वनकोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे करीत आहेत.
वनविभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अवैध शिकार, वन्यजीवांची तस्करी किंवा अशा प्रकारच्या संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित वनविभागाला माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
--------------------------------------------
“खवले मांजरासारख्या दुर्मिळ वन्यप्राण्यांची तस्करी रोखणे ही वनविभागाची प्राथमिक जबाबदारी आहे. अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर आम्ही अत्यंत कठोर कारवाई करत असून नागरिकांनीही सतर्क राहून संशयास्पद हालचालींची माहिती तात्काळ द्यावी,” असे वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे यांनी सांगितले.
Comments
Post a Comment