डिजिटल पद्धतीने होणार जनगणना 2027; सातारा जिल्ह्यात तयारीला वेग

डिजिटल पद्धतीने होणार जनगणना 2027; सातारा जिल्ह्यात तयारीला वेग

सातारा प्रतिनिधी दि. 10 – 

भारत सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या जनगणना 2027 उपक्रमासाठी देशभरात व्यापक तयारी सुरू झाली असून सातारा जिल्ह्यातही प्रशासनाने यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. जनगणना हा देशातील सर्वात मोठा प्रशासकीय व सांख्यिकीय उपक्रम मानला जातो. शासनाच्या धोरणनिर्मिती, विकास आराखडे, तसेच विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी जनगणनेतील माहिती अत्यंत महत्त्वाची ठरते.

सन 1872 पासून सुरू झालेल्या जनगणनेतील ही 16 वी जनगणना असून स्वातंत्र्यानंतरची 8 वी जनगणना असणार आहे. यंदाच्या जनगणनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे प्रथमच मोबाईल अॅपच्या माध्यमातून डिजिटल स्वरूपात माहिती संकलन केले जाणार आहे. त्यामुळे प्रक्रिया अधिक जलद, अचूक आणि पारदर्शक होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


जिल्हा जनगणना अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, जनगणनेदरम्यान संकलित होणारी सर्व वैयक्तिक माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल आणि ती केवळ सांख्यिकीय उद्देशासाठीच वापरली जाणार आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सर्व नागरिकांना या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

जनगणना 2027 ही दोन टप्प्यांत पार पडणार आहे. पहिला टप्पा 1 मे ते 14 जून 2026 या कालावधीत होणार असून यामध्ये घरयादी व घरगणना केली जाईल. 1 मे ते 15 मे दरम्यान नागरिकांना स्वगणनेचा पर्याय उपलब्ध असणार आहे. नागरिकांना अधिकृत संकेतस्थळावर जाऊन घराची स्थिती, उपलब्ध सुविधा व मालमत्तेची माहिती स्वतः भरता येणार आहे. त्यानंतर 16 मे ते 14 जून दरम्यान प्रगणक घरभेटी देऊन मोबाईल अॅपद्वारे सविस्तर माहिती संकलित करतील.

दुसरा टप्पा फेब्रुवारी 2027 मध्ये पार पडणार असून यामध्ये प्रत्यक्ष लोकसंख्या गणना केली जाणार आहे. व्यक्तीचे वय, लिंग, शिक्षण, व्यवसाय तसेच सामाजिक व आर्थिक माहिती नोंदवली जाणार आहे.

या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात 4 ते 6 मार्च 2026 दरम्यान प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये चार्ज ऑफिसर, टेक्निकल असिस्टंट व महसूल सहाय्यक यांना प्रशिक्षण देण्यात आले. ग्रामीण भागात तहसीलदार तर शहरी भागात मुख्याधिकारी चार्ज ऑफिसर म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. जिल्ह्यातील सुमारे 5000 प्रगणक व पर्यवेक्षकांमार्फत ही जनगणना पार पडणार असून त्यांना आधुनिक डिजिटल साधनांचा वापर करण्याचे विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे.


जनगणना 2027 – महत्त्वाची माहिती

▪ पहिला टप्पा : 1 मे ते 14 जून 2026 (घरगणना)
▪ स्वगणना कालावधी : 1 मे ते 15 मे 2026
▪ दुसरा टप्पा : फेब्रुवारी 2027 (लोकसंख्या गणना)
▪ डिजिटल पद्धतीने माहिती संकलन (मोबाईल अॅप)
▪ सातारा जिल्ह्यात सुमारे 5000 प्रगणक कार्यरत
▪ सर्व माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाणार

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl