युद्धजन्य परिस्थितीचा महाबळेश्वरला फटका; गॅसटंचाईमुळे व्यावसायिक अडचणीत, रॉकेल उपलब्ध करून देण्याची शिवसेना (UBT)ची तहसीलदारांकडे मागणी

युद्धजन्य परिस्थितीचा महाबळेश्वरला फटका; गॅसटंचाईमुळे व्यावसायिक अडचणीत, रॉकेल उपलब्ध करून देण्याची शिवसेना (UBT)ची तहसीलदारांकडे मागणी

महाबळेश्वर प्रतिनिधी : 

आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या अमेरिका–इराण युद्धजन्य परिस्थितीचे परिणाम आता स्थानिक पातळीवरही जाणवू लागले असून पर्यटननगरी महाबळेश्वरमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याची तक्रार पुढे येत आहे. गॅस सिलिंडर वेळेत उपलब्ध होत नसल्याने लहान-मोठ्या व्यावसायिकांवर मोठा परिणाम होत असून या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने महाबळेश्वरचे तहसीलदार सचिन मस्के यांना निवेदन देऊन व्यावसायिक व रेशनकार्डधारकांसाठी तातडीने रॉकेल (केरोसीन) उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.


महाबळेश्वर शहर शिवसेनेच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाबळेश्वर हे पर्यटनावर आधारित शहर असल्याने येथील हॉटेल व्यवसाय, हातगाडीधारक, वडापाव व चहा विक्रेते तसेच विविध खाद्यपदार्थ विक्रेते हे मोठ्या प्रमाणात व्यावसायिक गॅस सिलिंडरवर अवलंबून आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलिंडर वेळेत उपलब्ध होत नसल्याने अनेक व्यावसायिकांना व्यवसाय चालवणे कठीण झाले आहे. काही ठिकाणी व्यवसाय तात्पुरते बंद ठेवण्याची वेळही आली असून त्यामुळे स्थानिक व्यावसायिकांना आर्थिक फटका बसत आहे.

निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, सध्या निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस पुरवठा सुरळीत होण्यासाठी किती कालावधी लागेल याबाबत निश्चितता नाही. दरम्यान, पुढील महिन्यापासून महाबळेश्वरमध्ये उन्हाळी पर्यटन हंगाम सुरू होणार असून या काळात मोठ्या प्रमाणात पर्यटक शहरात येतात. अशा वेळी गॅसटंचाई कायम राहिल्यास पर्यटकांना सेवा देण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात व त्याचा थेट परिणाम स्थानिक अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून शासनाच्या माध्यमातून रेशनकार्डधारक नागरिक तसेच लहान-मोठ्या व्यावसायिकांसाठी रॉकेलचा पुरेसा साठा उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून पर्यायी इंधनाच्या माध्यमातून त्यांना व्यवसाय सुरू ठेवता येईल, अशी मागणी करण्यात आली आहे.

तहसीलदार सचिन मस्के यांना निवेदन देताना शिवसेना शहर प्रमुख राजाभाऊ गुजर, उपशहर प्रमुख राजेश साळवी, शंकर ढेबे, बाळकृष्ण ढेबे, शहानवाज भाई खरखंडे, दीपक ताथवडेकर, अभिजीत कानडे, आलीभाई वारुणकर, जितेश कुंभारदरे, नितीन वाडकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या मागणीवर प्रशासन काय निर्णय घेते याकडे आता महाबळेश्वरमधील व्यावसायिक व नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl