पश्चिम भागासाठी एसटी सेवेची हाक; पर्यटन, शिक्षण व दैनंदिन जीवनाला नवी गती मिळणार
पश्चिम भागासाठी एसटी सेवेची हाक; पर्यटन, शिक्षण व दैनंदिन जीवनाला नवी गती मिळणार
महाबळेश्वर प्रतिनिधी :
निसर्गसंपन्न व पर्यटन नगरी म्हणून देशभरात प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वर तालुक्यातील पश्चिम भागातील अनेक दुर्गम गावे आजही नियमित एसटी बस सेवेपासून वंचित असल्याचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर या भागात नवीन बस फेऱ्या सुरू करण्याची मागणी आता जोर धरू लागली असून स्थानिक पदाधिकारी व नागरिकांनी एसटी डेपो महाबळेश्वरचे मुख्य व्यवस्थापक यांना निवेदन सादर करून तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
सादर करण्यात आलेल्या निवेदनात महाबळेश्वर तालुक्याचा ऐतिहासिक, धार्मिक आणि नैसर्गिक वारसा अधोरेखित करत या भागातील पर्यटनस्थळांना योग्य वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. प्रतापगडसारखा ऐतिहासिक रणदुर्ग, पार येथील रामवरदायिनी माता मंदिर, जावळी येथील काळभैरवनाथ तीर्थक्षेत्र तसेच शिवकालीन स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना मानला जाणारा प्राचीन पूल ही स्थळे पर्यटक आणि भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनत आहेत. सोशल मीडियामुळे या ठिकाणांची लोकप्रियता वाढत असली तरी अपुऱ्या वाहतूक सुविधेमुळे पर्यटक व स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.याच अनुषंगाने महाबळेश्वर-जावळी-दरे हा बसमार्ग तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मार्गामुळे पश्चिम भागातील दुर्गम गावे तालुक्याच्या मुख्य प्रवाहाशी जोडली जातील तसेच जावळी येथील काळभैरवनाथ मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी प्रवास सुलभ होईल. याशिवाय सध्या सुरू असलेल्या ‘प्रतापगड दर्शन’ या एसटी बस फेरीमध्ये पार येथील रामवरदायिनी मंदिर व शिवकालीन पूल यांचा समावेश केल्यास पर्यटनाचा व्याप वाढून या भागातील स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल, असे मत निवेदनात व्यक्त करण्यात आले आहे.
स्थानिकांच्या मते, बस सेवा सुरू झाल्यास विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयात जाणे सोपे होईल, रुग्णांना वेळेत आरोग्यसेवा मिळेल तसेच शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन प्रवासातील अडचणी मोठ्या प्रमाणात कमी होतील. विशेषतः महिला, वृद्ध आणि दुर्गम भागातील नागरिकांसाठी ही सेवा अत्यंत जीवनावश्यक ठरणार आहे.
दरम्यान, या मागणीमुळे महाबळेश्वरच्या पश्चिम भागातील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे. एसटी प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी नवीन बस मार्ग सुरू करावेत आणि स्थानिकांच्या मागण्यांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या वेळी सनी मोरे (पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस, भाजप कामगार मोर्चा), गोपाळ भाऊ लाल बेग, अनिल लांगी (भाजप युवा मोर्चा महाबळेश्वर तालुका प्रमुख), नितीन काकडे आणि प्रतीक सपकाळ उपस्थित होते.
Comments
Post a Comment