राज्यस्तरीय ‘आदर्श ग्रामसेवक’ पुरस्काराने प्रियांका चव्हाण यांचा सन्मान; ग्रामविकासातील उल्लेखनीय कार्याची दखल

राज्यस्तरीय ‘आदर्श ग्रामसेवक’ पुरस्काराने प्रियांका चव्हाण यांचा सन्मान; ग्रामविकासातील उल्लेखनीय कार्याची दखल

✍️विजय जाधव,

गोडोली – प्रतिनिधी :

 ग्रामविकास क्षेत्रात उल्लेखनीय व आदर्श कामगिरी केल्याबद्दल पंचायत समिती सातारा अंतर्गत कार्यरत ग्रामपंचायत अधिकारी प्रियांका अभिजीत चव्हाण यांना महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय ‘आदर्श ग्रामसेवक’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभात राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या यशामुळे सातारा जिल्ह्याच्या ग्रामविकास विभागाचा मान उंचावला असून विविध स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.

प्रियांका चव्हाण यांनी सन २०२१–२२ या कालावधीत कोरेगाव तालुक्यातील गोगावलेवाडी व गोडसेवाडी या गावांमध्ये ग्रामसेवक म्हणून कार्य करताना ग्रामविकासाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली. गावांची स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, आरोग्यविषयक जनजागृती, शिक्षणवाढीसाठी केलेले प्रयत्न तसेच शासनाच्या विविध विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी या माध्यमातून त्यांनी ग्रामविकासाला गती दिली. विशेषतः ग्रामस्वच्छता अभियान, वृक्षारोपण व पर्यावरण संरक्षण उपक्रमांमध्ये ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग मिळवून त्यांनी गावांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणला.

याशिवाय ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवस्थापनात सुधारणा घडवून आणण्यासाठी मिळकत कर वसुली मोहिम राबवून त्यांनी अपेक्षित उत्पन्न वाढवले. विविध शासकीय योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत अनेकांना लाभ मिळवून दिला. गावांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यात समन्वय साधत काम केल्यामुळे ग्रामपंचायतींच्या कामकाजात पारदर्शकता आणि परिणामकारकता वाढली.

गोगावलेवाडी येथील भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणे तसेच त्यांना शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा विशेष उल्लेखनीय ठरला. भूमिहीन कुटुंबांना घरकुल पूर्ण होईपर्यंत मार्गदर्शन व मदत करत त्यांनी सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले. ग्रामविकासातील या समर्पित आणि प्रभावी कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना राज्यस्तरीय ‘आदर्श ग्रामसेवक’ पुरस्कार देऊन गौरविले.

हा पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, गटविकास अधिकारी सुशील संसारे, सहायक गटविकास अधिकारी संतोष पवार यांसह विविध अधिकारी, कर्मचारी व मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या या यशामुळे ग्रामविकास क्षेत्रात कार्यरत असलेल्या ग्रामसेवकांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले असून ग्रामीण भागाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे व समर्पितपणे काम करण्याची प्रेरणा मिळत आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl