साताऱ्यातील २९९ गावे निर्णायक टप्प्यावर; समृद्ध पंचायतराज अभियानात जिल्ह्याचा डंका वाजण्याची चिन्हे

साताऱ्यातील २९९ गावे निर्णायक टप्प्यावर; समृद्ध पंचायतराज अभियानात जिल्ह्याचा डंका वाजण्याची चिन्हे

✍️ विजय जाधव,

सातारा प्रतिनिधी : 

राज्यातील ग्रामीण विकासाला नवे बळ देण्यासाठी सुरू करण्यात आलेले मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान आता अंतिम टप्प्यात पोहोचले असून सातारा जिल्ह्यातील तब्बल २९९ ग्रामपंचायती सध्या निर्णायक टप्प्यावर पोहोचल्या आहेत. येत्या ३१ मार्च हा या अभियानाचा अंतिम दिवस असल्याने जिल्ह्यातील प्रशासन, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींनी राज्यस्तरावरील स्पर्धेत जिल्ह्याचा झेंडा फडकवण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने यासाठी व्यापक नियोजन करत गावागावांत प्रत्यक्ष जाऊन त्रुटी दूर करण्याचे काम सुरू केले आहे.


ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यक्षमता वाढवणे, शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि ग्रामविकासात पारदर्शकता आणणे या उद्देशाने ग्रामविकास विभागाने दि. १७ सप्टेंबर २०२५ पासून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सुरू केले आहे. या अभियानात आठ प्रमुख विषयांवर आधारित १०० गुणांचे मूल्यांकन करण्यात येत असून ग्रामपंचायतींना केवळ योजना राबवणे पुरेसे नसून त्या अधिक गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख पद्धतीने अंमलात आणणे आवश्यक आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींमध्ये चांगल्या कामांची स्पर्धा निर्माण झाली असून गावपातळीवर विकासकामांना वेग आला आहे.

सातारा जिल्हा परिषदेने या स्पर्धेसाठी विशेष लक्ष केंद्रित करत २९९ ग्रामपंचायतींची निवड केली आहे. या गावांमध्ये विविध विकासकामे, शासनाच्या योजनांची अंमलबजावणी, जलसंवर्धन, स्वच्छता, सामाजिक न्याय, लोकसहभाग आणि आर्थिक स्वावलंबन यांसारख्या बाबींवर विशेष भर दिला जात आहे. जिल्हा परिषदेचे सर्व खातेप्रमुख आणि अधिकारी गावांमध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी करत असून आवश्यक त्या सुधारणा तातडीने करण्यावर भर दिला जात आहे. पंचायत समिती आणि ग्रामपंचायत स्तरावरही या स्पर्धेसाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.

या अभियानांतर्गत राज्यभरात एकूण १९५२ पुरस्कार दिले जाणार असून त्यासाठी तब्बल २४५ कोटी २० लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. राज्यस्तरावर ग्रामपंचायत गटातील प्रथम क्रमांकाच्या ग्रामपंचायतीला ५ कोटी रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे. पंचायत समिती गटातील प्रथम क्रमांकासाठी २ कोटी रुपये तर जिल्हा परिषद गटातील प्रथम क्रमांकासाठी ५ कोटी रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये या स्पर्धेबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

अभियानात सुशासन आणि पारदर्शक प्रशासन, जलसमृद्धी आणि हरित गाव, सामाजिक न्याय, लोकसहभाग व श्रमदान, मनरेगा आणि इतर योजनांच्या अभिसरणातून शाश्वत विकास, नाविन्यपूर्ण उपक्रम, स्वनिधी आणि लोकवर्गणीद्वारे विकास तसेच गावातील विविध संस्थांचे सक्षमीकरण अशा आठ महत्त्वाच्या विषयांवर मूल्यांकन केले जात आहे. प्रत्येक घटकासाठी निश्चित गुणांकन ठेवण्यात आले असून त्या आधारे अंतिम निकाल निश्चित होणार आहे.

दि. ३१ मार्च रोजी या अभियानाची मुदत संपणार असल्याने आता सातारा जिल्ह्यातील विशेष लक्षित २९९ गावांपैकी कोणती गावे राज्यस्तरावरील करोडो रुपयांच्या पारितोषिकावर आपले नाव कोरणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. ग्रामीण विकासाच्या या स्पर्धेत सातारा जिल्हा आघाडीवर राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl