महाबळेश्वरचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व माजी सभापती मारुती दादा फळणे (गुरूजी) यांचे निधन
महाबळेश्वरचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व माजी सभापती मारुती दादा फळणे (गुरूजी) यांचे निधन
महाबळेश्वर प्रतिनिधी, दि. १३ :
महाबळेश्वर पंचायत समितीचे माजी सभापती, कोयना एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष तसेच ज्येष्ठ सभासद म्हणून ओळख असलेले आदरणीय मारुती दादा फळणे (गुरूजी) यांचे वयाच्या ९९ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने महाबळेश्वर परिसरात हळहळ व्यक्त होत असून सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील एक ज्येष्ठ मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
मारुती दादा फळणे यांनी आयुष्यभर शिक्षण, समाजकारण आणि ग्रामीण विकासासाठी कार्य केले. महाबळेश्वर पंचायत समितीचे सभापती म्हणून त्यांनी अनेक विकासकामांना चालना दिली होती. त्याचबरोबर कोयना एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. साधेपणा, प्रामाणिकपणा आणि लोकांशी असलेला जिव्हाळ्याचा संबंध यामुळे ते सर्वांच्या आदराचे केंद्र होते.
‘गुरूजी’ या नावाने सर्वत्र परिचित असलेल्या मारुती दादा फळणे यांनी अनेकांना शिक्षण, समाजसेवा आणि सार्वजनिक जीवनात मार्गदर्शन केले. त्यांच्या कार्यामुळे अनेक सामाजिक उपक्रमांना दिशा मिळाली. त्यांच्या निधनाची बातमी समजताच महाबळेश्वर परिसरातील विविध सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच नागरिकांनी दुःख व्यक्त केले असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
त्यांच्या पश्चात फळणे परिवार असा मोठा परिवार असून त्यांच्या निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, मारुती दादा फळणे (गुरूजी) यांच्यावर आज (दि. १३) सायंकाळी ५ वाजता महाबळेश्वर येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबीयांच्या वतीने देण्यात आली आहे. श्री छत्रपती मराठा संघ, सिद्धीविनायक मंदिर महाबळेश्वर तसेच जय भवानी मित्र मंडळ महाबळेश्वर यांच्या वतीनेही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.
Comments
Post a Comment