दापवडी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नूतन इमारतीत दिमाखात स्थलांतर; शेतकरी-महिलांना तत्पर सेवा द्या – रविकांत बेलोशे
दापवडी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नूतन इमारतीत दिमाखात स्थलांतर; शेतकरी-महिलांना तत्पर सेवा द्या – रविकांत बेलोशे
हुमगाव प्रतिनिधी :
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दापवडी (ता. जावली) येथील शाखेचे नूतन व सुसज्ज इमारतीत स्थलांतर करण्यात आले असून या नव्या कार्यालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले. दत्तात्रय कळंबे महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन रविकांत बेलोशे यांच्या हस्ते फित कापून नवीन कार्यालयाचे लोकार्पण करण्यात आले. या वेळी परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्राहक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या वेळी जिल्हा बँकेचे जावली व सातारा तालुका विभागीय विकास अधिकारी आर. एल. निकम, बसुली अधिकारी एस. एस. निकम, विकास अधिकारी डी. के. दुर्गावळे, दीपक पारठे, शाखा अधिकारी अमर बोडके, ज्योती रांजणे यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना रविकांत बेलोशे यांनी सांगितले की, जिल्हा बँकेची ही शाखा प्रामुख्याने ग्रामीण भागातील शेतकरी, धरणग्रस्त आणि महिला वर्गासाठी महत्त्वाची आहे. नव्या आणि सुसज्ज इमारतीमुळे ग्राहकांना अधिक चांगल्या सुविधा मिळतील. मात्र त्याबरोबरच बँकेने ग्रामीण भागातील ग्राहकांना अधिक वेगवान व तत्पर सेवा देण्यावर भर देणे आवश्यक आहे. शेतकरी आणि महिलांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी बँकेने सक्रिय भूमिका घ्यावी, असेही त्यांनी आवाहन केले.
यावेळी विभागीय विकास अधिकारी आर. एल. निकम यांनी जिल्हा बँकेच्या विविध लोकोपयोगी योजनांची माहिती देत शेतकरी व युवकांनी उपलब्ध कर्ज योजनांचा लाभ घ्यावा, असे सांगितले. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची कर्ज योजना, शैक्षणिक कर्ज तसेच स्ट्रॉबेरी पीक कर्ज अशा योजनांचा उपयोग करून युवकांनी स्वावलंबी व्हावे आणि आर्थिक प्रगती साधावी, असे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला काटवली विकास सोसायटीचे अध्यक्ष शंकर पवार, रांजणी-घोटेघर सोसायटीचे अध्यक्ष रामचंद्र रांजणे, दापवडी सोसायटीचे अध्यक्ष बी. एल. रांजणे, गोपाळ बेलोशे, रमेश रांजणे, विलास पाटील, माजी सरपंच संतोष रांजणे, दिनकर शिंदे, रघुनाथ पवार, चंद्रकांत रांजणे, मधुकर रांजणे, अनिल रांजणे, विश्वास रांजणे, भरत रांजणे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्राहक व सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत शाखा प्रमुख अमर बोडके यांनी केले, तर संदीप गोळे व नितीन पोफळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या दापवडी येथील विस्तारित कक्षाचे आता पूर्णवेळ शाखेत रूपांतर झाले आहे. काटवली, दापवडी आणि रांजणी-घोटेघर या तीन मोठ्या विविध कार्यकारी सोसायट्यांचे सर्व आर्थिक व्यवहार आता याच शाखेतून होणार आहेत. त्यामुळे ग्राहकांची संख्या आणि व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढणार असून कामाचा ताण लक्षात घेता या शाखेत तातडीने कर्मचारी संख्या वाढवावी, अशी मागणी परिसरातील ग्राहक आणि सभासदांनी बँक प्रशासनाकडे केली आहे.
फोटो ओळ : दापवडी येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी रविकांत बेलोशे, आर. एल. निकम, रमेश रांजणे व अन्य मान्यवर.
Comments
Post a Comment