इंधन पुरवठ्यावर नियंत्रणासाठी वाई तहसील कार्यालयात नियंत्रण कक्ष; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे प्रशासनाचे आवाहन
इंधन पुरवठ्यावर नियंत्रणासाठी वाई तहसील कार्यालयात नियंत्रण कक्ष; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे प्रशासनाचे आवाहन
वाई प्रतिनिधी , दि. १३ :
जागतिक परिस्थिती आणि इंधन पुरवठा साखळीवर संभाव्य ताण निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता वाई तालुक्यातील नागरिकांना एलपीजी गॅस तसेच पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. यासाठी वाई तहसील कार्यालयात तालुकास्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली असून इंधन वितरणावर देखरेख ठेवण्यासाठी पुरवठा शाखेमार्फत या नियंत्रण कक्षाचे संचालन करण्यात येणार आहे.
सध्या काही ठिकाणी नागरिकांमध्ये इंधन तुटवड्याबाबत भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याने अनेकांकडून अतिरिक्त साठा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे प्रत्यक्षात टंचाई नसतानाही कृत्रिम तुटवडा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही परिस्थिती टाळण्यासाठी प्रशासनाने वेळेत उपाययोजना करत नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. या माध्यमातून पेट्रोल-डिझेल आणि एलपीजी गॅसचा पुरवठा नियमितपणे होत आहे की नाही, यावर लक्ष ठेवले जाणार असून संबंधित एजन्सी, वितरक आणि पंपचालकांशी सातत्याने समन्वय साधला जाणार आहे.
नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून नागरिकांना इंधन पुरवठ्याबाबत अधिकृत माहिती देण्यात येणार असून तक्रारी किंवा अडचणी आल्यास त्यावर तत्काळ कार्यवाही केली जाणार आहे. तसेच इंधन साठवणूक, वितरण आणि पुरवठा प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठीही या कक्षाची महत्त्वाची भूमिका राहणार आहे.
या पार्श्वभूमीवर वाईचे तहसीलदार यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, इंधन तुटवड्याबाबत पसरत असलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अनावश्यक साठेबाजी करू नये. कोणतीही माहिती किंवा मदत आवश्यक असल्यास नागरिकांनी कार्यालयीन वेळेत सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ या वेळेत ९६३७९११६९९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. प्रशासनाकडून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात असून नागरिकांना आवश्यक इंधनाचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचेही तहसीलदारांनी स्पष्ट केले आहे.
Comments
Post a Comment